भाजपचं ‘निष्ठावंतांनो अजून वाट पहा’ हे सूत्र कायम; मराठवाड्यात सर्व आयात उमेदवार, जातीय समिकरणावर जोर

गेली अनेक वर्षांपासून पक्षात काम करणारे कार्यकर्ते नाराज आहेत. या निवडीच्या पा्र्श्वभूमीवर 'निष्ठावंत' भाजपचा कार्यकर्ता पुन्हा एकदा दुखावला गेला आहे.

News Photo   2026 06 01T143753.963

लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपने (BJP) लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांना विधान परिषदेची उमदेवारी दिली आहे. तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून माळी समाजास आणखी एक प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे. या मतदारसंघातून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून अमरनाथ राजूकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ‘बाहेरुन येणाऱ्यांना प्राधान्य’ हे सूत्र राखलं जात असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

यामध्ये बसवराज पाटील आणि अमरनाथ राजूकर या दोघांनी पूर्वी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. तर सुहास शिरसाट हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. या निवडीच्या पा्र्श्वभूमीवर ‘निष्ठावंत’ भाजपचा कार्यकर्ता पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपूत्र अशी उमरगा तालुक्यातील बसवराज पाटील यांची ओळख कायम होती. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्द असणारे बसवराज पाटील हे उमरगा आणि औसा या मतदारसंघातून निवडून येत.

या दोन्ही मतदारसंघात लिंगायत मतांचा प्रभाव अधिक. वागण्या- बोलण्यातील कमालीचे सौम्य असणाऱ्या बसवराज पाटील यांनी शिवराज पाटील चाकुरकर यांच्या परवानगीने ‘भाजप’मध्ये प्रवेश केला. गेले काही दिवस भाजपमध्ये काम केल्यानंतर बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळू शकते, असा दावा त्यांचे समर्थक करत होते. ‘लिंगायत मतांवर’ प्रभाव निर्माण करु शकणाऱ्या बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळाली परिणामी उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघातील बसवराज मंगरुळे यांचा पत्ता कट झाला.

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपकडून 11 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा संपूर्ण यादी

राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची सावलीसारखी पाठराखण करणारे अमरनाथ राजूरकर यांनाही भाजपने उमेदवारी उमेदवारी दिली आहे. त्यामुळै नांदेड भाजपचं राजकारण आता पूर्णत: अशोक चव्हाण यांच्याकडं सुपूर्द करण्यात आल्याचा संदेश या उमेदवारीच्या निमित्ताने दिला गेला आहे. ते मराठवाड्यातील एकमेव ब्राम्हण उमेदवार आहेत. यामुळे नांदेडमधून उमेदवारी मागणारे चैतन्य बापू देशमुख आणि धाराशिवचे दत्ता कुलकर्णी यांना मात्र, पुन्हा वाट पहावी लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात मात्र नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. सुहास शिरसाट हे फुलंब्री तालुक्यात काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. त्यांच्या आई पार्वताबाई शिरसाट पंचायत समितीमध्ये सभापती होत्या. छगन भुजबळ यांच्या समवेत काम करणारे सुहास शिरसाट हे काही दिवासांपूर्वी भाजपमध्ये आले. दहा वर्षापासून काम करणाऱ्या शिरसाट यांना अचानक उमेदवारी मिळाल्याने रांगेत असणाऱ्या शहरी नेत्यांना चपराक बसल्याचं मानलं जात आहे.

फुलंब्री या मतदारसंघावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांची पकड आहे. या मतदारसंघातील शिरसाट यांना भाजपने उमदेवारी दिली आहे. राज्यसभेची उमेदवारी देतानाही धनगर समाजातील रामराव वडकुते यांना प्राधान्य देण्यात आलं होतं. जातीय गणितांचं सूत्र मांडून भाजपने मराठवाड्यातील मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘अजून वाट पहा’ असाच संदेश दिला आहे.

follow us