सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली, तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची अचानक प्रकृती बिघडल्याने खळबळ उडाली आहे.
Valmik Karad admitted to District Hospital due to deteriorating health : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकाणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची अचानक प्रकृती बिघडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने प्रशासनाने तातडीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची सखोल तपासणी सुरू असून, तपासणीनंतरच त्याच्या प्रकृतीबाबत अंतिम वैद्यकीय अहवाल दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रुग्नालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले. दरम्यान, वाल्मिक कराडचे काही समर्थक आणि कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संतोष देखमुख हत्याप्रकरणाला आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असून, या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता, त्यामुळे तपास यंत्रणांवर देखील प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडने तुरुंगातून बाहेर पाडण्यासाठी अनेकवेळा जामिनासाठी प्रयत्न केले. मात्र, सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालय, या तिन्ही स्तरांवर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे. जामीन नाकारल्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः त्याच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्याची देखील चर्चा रंगली होती.
एकूणच, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि आता आरोपीची बिघडलेली प्रकृती, या सर्व घडामोडींमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुढील काही तासांत डॉक्टरांचा अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रियेतील घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.