Eknath Shinde : बंजारा समाजासाठी CM शिंदेंची मोठी घोषणा; पोहरादेवीसाठी ५९३ कोटींचा विकासनिधी
वाशिमः बंजारा समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यासाठी बंजारा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मागील अडीच वर्ष बंजारा समाजासाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. मात्र, आमच्या सरकारमध्ये बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे आणि मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बंजारा समाजाच्या पोहरादेवी देवस्थान येथे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पोहरादेवी (Pohradevi) येथे 593 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी करण्यात आली. सोबतच संत सेवालाल महाराजांच्या (Saint Sewalal Maharaj) पंचधातू पुतळ्याचे व 135 फुट उंच सेवाध्वजाचे अनावरण झाले. बंजारा समाजाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेत भाषणाला सुरूवात केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज आहे. आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा ध्वज उभा राहिला. सेवालाल महाराज यांचा अश्वारुढ पुतळा याठिकाणी उभा राहिला. संजय राठोड हे सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्याचा हा परिणाम आहे. संत रामराव बापू यांनी सुद्धा पाठपुरावा केला. त्यामुळं या भूमिपूजनाचा योग आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, बंजारा समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यासाठी बंजारा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे. बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ५९३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बंजारा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. संजय राठोड यांच्या मागणीनुसार ५० कोटी रुपये बोर्डाला देण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाज भवनाची मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून नवी मुंबईत बंजारा समाजाचं भवन होईल. बंजारा समाजाच्या अनेक मागण्या केल्या आहेत. वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
काँग्रेसकडून Balasaheb Thorat च्या मनधरणीचे प्रयत्न, थोरातांची नाराजी दूर होणार का?
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. तांडा वस्ती सुधार योजना बळकटी देणार, या योजनेअंतर्गत तांड्यावर चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, शाळा, दवाखाना, अंगणवाडी देण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशी घोषणा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, हे सरकार बंजारा समाजाच्या पाठिशी उभं राहणारं सरकार आहे. त्यामुळं बंजारा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही, त्यांना शिक्षणासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्यांच्या शिक्षणाचा पूर्णपणे सरकार त्यांचा खर्च करेल, हेदेखीन सांगतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘आम्ही या समाजाला भरभरून दोन्ही हातांनी देणार आहोत. तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या आहेत. आपल्या ज्या मागण्या आहेत. ज्यातून समाजाची प्रगती होईल, उन्नती होईल. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.