चंद्रपुरात 8 जणांवर काळाचा घाला! शेतात काम करण्यासाठी गेले पण परतलेच नाही…

चंद्रपुरात 8 जणांवर काळाचा घाला! शेतात काम करण्यासाठी गेले पण परतलेच नाही…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. या दरम्यान, एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, कोरपना आणि गोंडपिंप्री तालुक्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. (in chandrapur eight people died due to the by lightning)

गीता पुरुषोत्तम ढोंगे (45), गोविंदा लिंगू टेकाम (56), अर्चना मोहन मडावी (27), पुरुषोत्तम अशोक परचाके (25), कल्पना प्रकाश झोडे (40), अंजना रूपचंद पुस्तोडे (50), योगिता खोब्रागडे (35), रंजना बल्लावार (25) अशी मृतांची नावे आहेत. ब्रम्हपुरीजवळील मौजा बेताळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (45) या आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेतातून काम करून घरी परतत होत्या. वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मराठवाड्यात पेट्रोल-डिझेल डेपोची उभारणी होणार, मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचा आढावा 

वनमजूर गोविंदा लिंगू टेकाम (56) हे गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथील जंगलात वृक्षारोपणाच्या कामात मग्न होते. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पडल्याने टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील चनई बु. येथे तरुण शेतकरी पुरुषोत्तम अशोक परचाके (25) यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे शेतात काम करत असताना वीज पडून कल्पना प्रकाश झोडे (40) व अंजना रूपचंद पुस्तोडे (50) या दोन महिलांचा मृत्यू झाला, तर सुनीता सुरेश आनंदे (30) या महिला जखमी झाल्या. गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथील योगिता खोब्रागडे (35) आणि नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील रंजन बल्लावार यांचाही वीज पडून मृत्यू झाला.

पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात काम करत असताना अर्चना मोहन मडावी (27) या महिलेचा मृत्यू झाला, तर खुशाल विनोद ठाकरे (30), रेखा अरविंद सोनटक्के (45), सुनंदा नरेंद्र इंगोले (46), राधिका राहुल भंडारे (20) यांचा मृत्यू झाला. वर्षा बिजा सोयाम (40), रेखा ढेकलू कुळमेथे (45) हे जखमी झालेत. जखमींपैकी खुशाल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागभीड तालुक्यातील नांदेड येथे रोवणीचे काम सुरू असताना वीज कोसळली. सोफिया शेख (17) आणि महेशा शेख (16) या दोघी गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube