EVM वरून काँग्रेसमध्ये फूट! पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी लावला नाराजीचा सूर?

EVM वरून काँग्रेसमध्ये फूट! पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी लावला नाराजीचा सूर?

Congress Party : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आघाडीतील तिन्ही पक्षांची दाणादाण उडाली. काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या. या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये (Congress Party) असंतोष धुमसू लागला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या बैठकीत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट दिसून आले. ईव्हीएमच्या मु्द्द्यावर पक्षांत दोन गट पडल्याचे या बैठकीत अधोरेखित झाले. ईव्हीएमचा दोष वाटतो का, असा थेट प्रश्न चेन्निथला यांनी सर्व पराभूत उमेदवारांना विचारला. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही जणांनी मात्र ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.

काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट! पटोले नको ठाकरे हवेत; बैठकीतील आतली बातमी फुटली

विधानसभेत काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलायचा का याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

काँग्रेस ताकदीने लढलाच नाही

रमेश चेन्निथला यांनी निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशीही स्वतंत्र चर्चा केली. ईव्हीएमचा दोष वाटतो का असा प्रश्न त्यांनी या उमेदवारांना विचारला. कारण निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. ज्यांचा पराभव होणार नाही अशी खात्री असताना त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता.

यामध्ये काँग्रेसचे नेते देखील आघाडीवर होते. या बैठकीतही चेन्निथला यांनी हा प्रश्न उमेदवारांना विचारला. त्यावर बहुतांश उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला. मात्र काही उमेदवार असेही होते ज्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही. ईव्हीएमवर खापर फोडणे योग्य नाही. विधानसभेतील १६ पैकी १५ आणि विधानपरिषदेतील ८ पैकी ७ आमदार आणि पराभूत ४७ उमेदवारांनीही रमेश चेन्निथला यांची भेट घेतली.

ऑपरेशन लोटसच्या चर्चांवरून नाना पटोलेंचा थेट वार; म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंना..

नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात ?

दरम्यान, निवडणुकीतील पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार असल्याचा सूर काँग्रेसमधूनच येऊ लागला आहे. पटोले यांच्याऐवजी आमदार विकास ठाकरे यांंना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत पदाधिकारी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे याची माहिती चेन्निथलांनी या बैठकीत घेतली. या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल तयार करून तो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवण्यात येणार आहे. यानंतर गटनेते पदाचा निर्णय दिल्लीतून कळवण्यात येईल. तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घेण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube