Nagpur : पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय; सरकार तातडीने देणार आर्थिक मदत
Nagpur : मुसळधार पावसाने नागपूर (Nagpur) शहराला जबरदस्त तडाखा दिला. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस नागपुरात (Nagpur Rain) पडला. या पावसात मोठी हानी झाली. या नुकसानीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.
नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. या बैठकीला कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, संदीप जोशी, तसेच इतरही लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते.
Nagpur : दोन तासांचा पाऊस दोन महिलांच्या जीवावर बेतला; 400 जणांची सुटका; जनावरांचीही जिवीत हानी
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवघ्या 4 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले. नाल्याजवळच्या भिंती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले.
सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येतील. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांचे नुकसान झाले, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार तसेच टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. आज या स्थितीनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता तो बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला