भाजपला मोठा धक्का! सुधाकर अडबालेंचा मोठ्या फरकाने विजय

भाजपला मोठा धक्का! सुधाकर अडबालेंचा मोठ्या फरकाने विजय

नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपच्या नागो गाणार (Nago Ganar) यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudharkar Adbale) विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून नागो गाणार यांना 6 हजार 309 मते मिळाली आहेत.

सुधाकर अडबाले यांच्या विजयाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मोठा धक्का बसल्याचं मानंल जातंय. कारण भाजपने या निवडणुकीत दुसरा कोणताही उमेदवार देता या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच पाठिंबा देऊन भाजपचा उमदेवार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तर दुसरीकडे नागपुरातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे ही निवडणूक भाजप-महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची मानली जात होती.

अखेर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांनी मोठ्या मताधिक्क्याने मतदारसंघाचे आमदार राहिलेले नागो गाणार यांचा पराभव करीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. ऐनवेळी शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. तर राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवर यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुख्य लढत ही भाजपचा पाठिंबा घेतलेले नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात होती.

निवडणुकीत एकूण 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज मागे घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश इटकेलवर यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नव्हता. तरीदेखील काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांनी जोर दाखवत भाजपच्या बालेकिल्ल्यात नागो गाणार यांनी धूळ चारलीय.

दरम्यान, नाशिक आणि नागपूर या दोन्ही जागांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून बंडखोरी करण्यात आल्याच्या घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. नाशिक पदवीधरमधून काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश इटकलेवार यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालंय.

या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून बंडखोरी करण्यात आल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर नागपूर मतदारसंघात सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. आता नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लागून राहिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube