Video : फडणवीसांच्या सूचक विधानानं मोठा गेम होण्याची शक्यता; रोख नेमका कुणाकडे?
मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा राजकीय गेम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीसांचे हे विधान नेमकं कुणाला उद्देशून होतं? याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. (Devendra Fadnavis First Speech After Elected As The Leader of Maharashtra BJP Legislative Party)
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; तुम्ही पाहिलीत का?
मोदींचे मानले आभार
उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं त्यामुळे मी माननीय मोदीजींचे मी आभार मानतो. तसेच एकमताने माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केल्याबद्दल त्यांनी उपस्थितांसह सर्वांचे आभार मानले. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती असे सांगत एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं असे फडणवीस म्हणाले. एवढेच नव्हे तर, मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो असे म्हणत यावेळी फडणवीसांनी इथं मनानं उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही आभार मानले. यावेळी त्यांनी आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू असा विश्वास व्यक्त केला. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही असा उल्लेखही फडणवीसांनी न विसरता केला.
सात कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक राज्यपाल अन्.. अजितदादांच्या यादीत आणखी काय?
चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी…
आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नसून, लार्जर इंटरेस्टमधे आपण एकत्र काम करू. कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरूद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळ्यांशी जुळवून घेऊ असे फडणवीसांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. त्यांचे हे विधान नेमकं कुणाला उद्देशून होते हे मात्र, समजू शकलेले नाही.
तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कुणी तरी मोठं करावं यासाठी आलेलो नाहीत. येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील मात्र, तरीही आपण लार्जर इंटरेस्टमध्ये सगळ्यांशी जुळवून घेऊ असे फडणवीसांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.