MLC Election : पदवीधरसह शिक्षक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

MLC Election : पदवीधरसह शिक्षक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (दि.30) मतदान होत आहे. नाशिक (Nashik)आणि अमरावती (Amravati)या विभागात पदवीधर तर औरंगाबाद(Aurangabad), नागपूर (Nagpur)तसेच कोकण (Kokan)या शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आज मतदान झाल्यानंतर येत्या 2 फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना होणार असल्याचं दिसून येतंय. नाशिक आणि नागपूर विभागाच्या मतदारसंघांत चुरस चांगलीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. आता या मतदारसंघात कोणता बाजी मारणार हे 2 फेब्रुवारीलाचं समजणार आहे. जाणून घ्या कोणत्या मतदार संघात काय स्थिती.

विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघातील. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागं घेतला आणि त्याचवेळी त्यांचे चिरंजिव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पक्षविरोधी भूमिकेमुळं काँग्रेसनं तांबे पिता पुत्राची पक्षातून हकालपट्टी केली. तर महाविकास आघाडीनं ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसचे धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. या पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनानं शिवसेनेच्या (ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे मैदानात उतरलेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचं आव्हान आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं ही लढत देखील जांगलीच चुरशीची होणार आहे.

औरंगाबात शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असाच सामना पाहायला मिळणारंय. अनेक वर्षांपासून औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळं हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी चांगली टक्कर देणार आहेत. विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube