फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात ‘त्यांना’ सोडणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले जात आहेत. आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, ज्यांचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटकही केली. त्यातलं सर्व सत्य हे बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख केला. आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आहे, फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, असा उल्लेख फडणवीसांनी केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना; फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री
अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवायचं, अशाप्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजित दादा, सचिन दादाचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करुन मी या ठिकाणी आलो नसतो.
अशा गोष्टीत मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहेत, तिथे मी काहीच तडजोड करत नाही. पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक गोष्टीत जर राजकीय भूमिका कोणी घेत असेल तर तेही मी सहन करणार नाही. त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील तुम्ही समजून घ्या, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
