शिवसेनेतून बाहेर गेलेले निवडणुकीत.., Ajit Pawar यांचा निशाणा

शिवसेनेतून बाहेर गेलेले निवडणुकीत..,  Ajit Pawar यांचा निशाणा

अहमदनगर : जे शिवसेनेतून बाहेर पडलेत ते निवडणुकीतून पडले असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे बोलताना म्हणाले, 1991 साली शिवसेनेचे आमदार फुटले होते. त्यावेळी अनेक नेते शिवसेना सोडून गेले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सोडून गेलेले नेते पडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ज्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यांचं काही लोकांकडून पुनर्वसनही करण्यात आलं आहे. देशात अनेक नेते आम्ही पाहिलेत. मात्र, असं फोडाफोडीचं राजकारण त्यावेळी पाहायला मिळालं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

सध्या विरोधकांकडून बेताल वक्तव्ये करण्याचं काम सुरु आहे. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा आहे, याचा विसर पडल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

1991 साली मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे, त्यानंतर मी लोकांची कामे केली आणि पुढे निवडणुकीत निवडून येत गेलो आहे. तुम्ही अशी वक्तव्ये करण्यापेक्षा लोकांची कामे करण्याला प्राधान्य द्या असाही सल्ला त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद दिला आहे. आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुराव्यामुळेच तालुक्यात पाणीपुरवठा योजना आली आहे. वैचारिक मतभेद फक्त निवडणुकीपुरतेच असतात, निवडणूक झाल्यानंतर आम्ही जनतेच्या हिताच्या कामाकडे लक्ष देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अहमदगरमधील तीसगाव इथं आज या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, प्रताप ढाकणे, यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube