निलेश लंकेचे दारही ईडीने ठोठावले होते…. पण अधिकाऱ्यांनाच….
ED also knocked on Nilesh Lanka’s door : केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) भाग असलेल्या ईडीच्या (ED) कारवायांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काही महिन्यांपासून विरोधकांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या कारवाया सुडभावनेने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या गैरवापराविषयी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्यात सध्या चुकीचे पध्दतीन राजकारण सुरू असून माझीही 2022 मध्ये ईडीकडून चौकशी झाली होती, असा गौप्यस्फोट लंके यांनी केला आहे.
अमहनगरमध्ये महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून काल लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी निलेश लंके बोलत होते. यावेळी बोलतांना लंके म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी घेऊन, त्यांचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे. 2022 साली माझीही ईडीकडून चौकशी झाली होती, तेव्हा ईडीवाले वैतागून गेले होते. कारण, त्यांना माझ्याकडे काहीच सापडले नाही. ते म्हणाले, या निलेश लंकेकडे काहीच निघत नाही. त्यावेळी मी मनात म्हटलं की, उलट ईडीवालेच खिशातले पैसे काढून म्हणतील की, हे पैसे ठेऊन घे, खर्चाला कामी येतील. ईडीवाले आले अन् नुसते येडे होऊन गेले होते, असं लंके यांनी सांगिलतं.
Japan PM : भाषण चालू असतानाच बॉम्बहल्ला; जपानचे पंतप्रधान थोडक्यात बचावले
लंके म्हणाले की, हा फक्त सत्तेचा गैरवापर चालू आहे. पण, लक्षात ठेवा आम्ही देखील अडीच वर्ष सत्तेत होतो. मात्र, सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही. सर्वसामान्य माणसांना कसा फायदा होईल, याचा प्रयत्न केला, असं लंके म्हणाले.
यावेळी बोलतांना लंके यांनी विखेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 2022 ला माझी ईडीकडून चौकशी झाली, पण ईडीची धमकी देण्याचं काम त्यांचं नाही, ते एवढं सोप्पं आहे का? संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो. हा इतिहास जिल्ह्यात सर्वांना माहित आहे, असं लंके म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे केंद्रीय सरकार हुकूमशाही पध्दतीने विरोधकांना घाबरवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. राज्यात सुडबुध्दीने ह्या कारवाया केल्या जात आहेत. विरोधकांना घाबरवण्यासाठी या कारवाया भाजपच्या षडयंत्राचा भाग असल्याची टीका विरोधक करत असतात. दरम्यान, आता लंकेंनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर भाजपचे नेते नेमकं काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.