भाविकांकडून थेट विठ्ठलाला गंडा; करोडोंचे खोटे दागिने दानपेटीत
पंढरपूर : खोटे दागिने विकून किंवा खोटे दागिने विकत घेऊन फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली असतील पण लोकांनी आता थेट पंढरपूरच्या विठ्ठलाची खोटे दागिने देऊन फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विठ्ठलाला थेट पोतंभर खोटे दागिने दान केल्याचं समोर आलं आहे.
गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठठलाला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. दर्शन घेतात, नवस बोलतात आणि विठ्ठलाच्या पायाशी दानही करतात. दान केलेल्या वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांसह दागदागिन्यांचाही समावेश असतो. मात्र आता विठ्ठलाला दान करण्यात आलेले दागिनेच नकली निघाल्याचे समोर आले आहे. दानपेटीत जमा झालेले सोने मोजताना हा प्रकार समोर आला आहे. अशा नकली दागिन्यांची संख्या एक पोते भरेल इतकी झाली आहे.
या दागिण्यांमध्ये चांदीसारखे दिसणारे पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, जोडवी, पैंजण, हळदी- कुंकवाच्या डब्या, तबक यांचा समावेश आहे. तर सोन्याच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये मणी मंगळसूत्र, नथ, कानातील दागिने दानपेटीत आढळून आले आहेत. सोन्या-चांदीसारख्या दिसणाऱ्या वस्तू अधिक आवश्यक नसल्यामुळे त्यांचे मोजमाप होत नाही. परंतु त्या जतन करून ठेवल्या जातात. सध्या समितीकडे नकली सोने- चांदीच्या पोतेभर वस्तू साठल्या आहेत.