आभाळ कोसळलं; रस्ते अन् घराला तलावाचं स्वरुप, सोलापुरातली कुटुंब उघड्यावर…
सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला आणि घराला तलावाचं स्वरुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Solapur Rain : हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सोलापुर जिल्ह्याला काल मुसळधार (Solapur Rain) पावसाने चांगलंच झोडपलंय. पावसाचा जोर इतका होता की, जणू जिल्ह्यावर आभाळ कोसळल्याची परिस्थिती असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या पावसामुळे सोलापुरातील रस्ते आणि घरांना तलावाचं स्वरुप आलं असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील सर्वच घरात पाणी शिरल्याची परिस्थिती पाहायला मिळतेयं. तर अक्कलकोट रोड,, पंजावणी मार्केट, होटगी रोड परिसरात तलावाचं स्वरुप आलं आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून संपूर्ण रात्र पावसात भिजत काढल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. घरात पाणीच पाणी झाल्याने अनेक कुटुंबांच्या संसारपयोगी वस्तू साहित्य अस्ताव्यस्त झाले आहेत.
काल 12 वाजल्यापासून पाऊस सुरु असून पावसाचं पाणी येणं सुरुच होतं. आम्ही सगळे झोपेत होतो. पाऊस येत असल्याचं मी घरात सांगितलं. घरात पाणीच पाणी झालं होतं, रात्रभर आम्ही पाण्यातच होतो. रात्रीपासून आम्ही सर्वजण उपाशीच, असल्याचं सांगताना सोलापुरातील महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.
ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारने घेतला आणखी एक धडाकेबाज निर्णय
होटगी तलाव ओव्हरफ्लो…
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापुर जिल्ह्यात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. सोलापुरातील होटगी तलाव अक्षरश: ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यासोबतच शहरातील इतर सर्वच भागात पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलं असून एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. शेती आणि शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.