सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी : निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे. कारण आपण जसजसे वयस्कर होतो, तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते.

Pune News : विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे. कारण आपण जसजसे वयस्कर होतो, तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते. ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा. म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉ.भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने ९ वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नऱ्हे येथील संस्थेच्या (Pune News) सभागृहात पार पडला. यावेळी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या. आदर्श कुलगुरू पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा.डॉ. सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्रा. भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक, दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक, अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉ. स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वे इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स चे प्रा. चेतन दिवाण यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
डॉ.भूषण गोखले म्हणाले, डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्य असे होते की ते आयुष्यभर शिकतच राहिले. शिक्षक म्हणून आपणही त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजे. जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता. विद्यार्थ्यांकडे केवळ ज्ञानच नव्हे तर कौशल्य असले पाहिजे. नेहमी सकारात्मक रहा, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा. समाजातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
डॉ. दीपक शहा म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शिक्षण प्रणाली येत आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवणारे नव्हे तर उत्तम माणूस बनवण्याचे काम होईल. या धोरणामुळे शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येणार आहेत आणि त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना समर्थपणे तयार व्हावे लागेल. आजची मुले खूप हुशार आणि तंत्रज्ञानप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अपग्रेड करणे आवश्यक आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण होईपर्यंत संस्कारक्षम विद्यार्थी तयार होणार नाहीत. पुण्याने पहिली शाळा, पहिली महिला डॉक्टर देशाला व महाराष्ट्राला दिली. येणाऱ्या काळातही मोठे बदल घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला ‘समाजसेवक’ म्हटले जाते, तसेच शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकाला ‘शिक्षणसेवक’ म्हणतात. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समजून घेऊन त्यांना सन्मान द्यावा आणि त्यांचा आदर राखावा, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
जाधवर ग्रुपचा डंका! आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या 59 विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये निवड