राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस! जिल्हा सहकारी बॅंकेत घुलेंचा पराभव झाल्याने कार्यकर्ते नाराज
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा (Shiv Sena) अंतर्गत कलह चर्चेचा मुद्दा ठरत असला तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Ahmednagar District Cooperative Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असूनही राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा उठवत भाजपने खेळी खेळली आणि अवघ्या एका मताने बॅंकेची सत्ता खेचून आणली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेले उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrasekhar Ghule) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. दरम्यान, हा पराभव जिव्हारी लागल्याने आता घुलेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
आता या आक्रमक कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी चंद्रशेखर घुले यांनी आज अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेवगाव टाऊन शाखेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ही बैठक जिल्ह्यातील आगामी राजकारणाची दिशा आणि दशा ठरविण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर घुले यांचे अध्यक्षपद उमेदवारीसाठी नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सुचवले होते. त्यासाठी त्यांनी अहमदनगर मधील शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन बँकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना घुले यांना निवडून आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जवळ सर्वाधिक नऊ संचालक आहेत. असं असतानाही केवळ सहा संचालक असलेल्या भाजप आणि विखे गटाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपचा हा विजय घुले यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
सट्ट्याने वाढला वाद.. चंद्रकांतदादा म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं..
घुले यांच्या समर्थकांनी अहमदनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा बँकेतील गद्दार संचालकांच्या बडतर्फीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर घुले यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही नेत्यांबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. यात एका माजी आमदाराचा ही समावेश आहे. घुले यांनी कार्यकर्त्यांची मते आज जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मंगळवारी (ता. १४) जाहीरपणे स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीआधीच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.