छत्रपती उदयनराजे भाजपमध्ये नाराज? बावनकुळेंचा नकार, पण पडद्यामागे वेगळंच घडतंय….

छत्रपती उदयनराजे भाजपमध्ये नाराज? बावनकुळेंचा नकार, पण पडद्यामागे वेगळंच घडतंय….

सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे सातारमधील राजकीय जाणकार सांगत आहेत. याचीच नेमकी काय कारणे आहेत ते आपण पाहणार आहोत. (Is MP Udayanaraj Bhosle unhappy with BJP)

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच साताऱ्या जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी उदयनराजे यांच्या कथित नाराजीबद्दल सवाल विचारला. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी “खासदार उदयनराजे हे नियमितपणे माझ्याशी बोलत असतात, त्यामुळे माझ्याबाबत किंवा पक्षाबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाही” असे म्हणत पत्रकारांचे म्हणणे खोडून काढले.

मात्र उदयनराजे नाराजच!

मात्र उदयनराजे नाराज आहेत, असे साताऱ्यातील राजकीय जाणकार सांगत आहेत. त्याची कारणेही तशीच आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपकडून उभे राहिले. त्यांना भाजपने त्यावेळी दोन शब्द दिल्याचे सांगितले गेले होते. यापैकी एक होता पराभूत झाले तरी राज्यसभेवर घेण्याचे. हा शब्द भाजपने पाळला. त्यांना तात्काळ राज्यसभेवर पाठविण्यात आले.

दुसरा शब्द होता केंद्रात मंत्रिपदाचा होता. पण आता लोकसभेचा संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला, पण त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. त्यांच्या नाराजीचे पहिले कारण हेच आहे. यावरुन शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना एकदा सबुरीचा सल्लाही दिला होता. “थोडं थांबण्याची तयारी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असली पाहिजे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे” असा सल्ला त्यांनी दिला होता.

‘बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच’; चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावूनच सांगितलं

दुसरे कारण म्हणजे सातारा लोकसभेवरील अजितदादांचा क्लेम. सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सिटींग खासदार म्हणून पहिला क्लेम राष्ट्रवादीचाच राहणार आहे. त्यामुळे जर जागा राष्ट्रवादीकडे गेली तर आपल्या पुढच्या राजकारणाचे काय? 2026 मध्ये पुन्हा राज्यसभा न मिळाल्यास  भाजपमध्ये राहुन करणार काय? असा मोठा सवाल त्यांच्यापुढे असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे अजितदादांचे भाजपसोबत येणे हे उदयनराजेंच्या नाराजीचे दुसरे कारण अशू शकते.

तिसरे कारण, लोकसभेला सातारा मतदारसंघ भाजपकडे राहिलाच तर इथून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे जाहीर संकेत गतवेळच्या सातारा दौऱ्यात बावनकुळे यांनी दिले होते. भाजपकडेही दोन्ही राजेंव्यतिरिक्त तिसरा चेहरा सध्या तरी नाही. आता कायम ज्यांच्या विरोधात राहुन राजकारण करत आलो, त्यांचेच काम लोकसभेला कसे करायचें? यावरुनही उदयनराजे नाराज असल्याचे बोलले गेले.

चौथे कारण म्हणजे सातारा नगरपालिकेचे. सातारा नगरपालिका ही उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही राजे अनेक वर्ष एकाच पक्षात असूनही एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवतात. सत्ता आपल्याकडेच कशी राहील यासाठी प्रयत्न करतात. गतवेळी नगरपालिकेवर उदयनराजेंच्या गटाची सत्ता होती. दोघांमध्ये वितुष्ट येण्याचे सातारा नगरपालिका हे सर्वात मोठे कारण आहे.

Ajit Pawar : ‘मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल’; थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!

मात्र ही निवडणूक दोघांनी एकत्र येऊन भाजपच्या तिकीटावर लढवा असा राज्य भाजपचा दबाव आहे. बावनकुळेंनी दोन्ही राजेंना याबाबत कल्पना दिली आहे. असे झाल्यास स्थानिक राजकारणात नेमके कोणाचे वर्चस्व असा वाद उभा राहु शकतो. याची कल्पना उदयनराजेंना आहे. यावरुनच त्यांची नाराजी टोकाला गेली असल्याचे सांगितले जात आहे.

उदयनराजेंपुढे पर्याय काय?

उदयनराजे भोसले यांच्यापुढे पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरणे हा पर्याय असल्याचे दिसून येते. मग तो अजितदादांच्या गटाचा असो की शरद पवार यांच्या गटाचा असो. कारण लोकसभा मतदारसंघ अजितदादांकडे गेल्यास त्यांनाही उदयनराजेंच्या रुपाने तगडा उमेदवार मिळू शकतो. तर शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील वयोमानामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिथेही उदयनराजे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र गतवेळी उमेदवार निवडण्यात चूक झाली म्हणणारे शरद पवार पुन्हा उदयनराजेंना पायघड्या घालणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube