75 हजार पदभरतीची नुसतीच घोषणा, विद्यार्थी करणार उद्या ‘ट्वीटर वॉर’

75 हजार पदभरतीची नुसतीच घोषणा, विद्यार्थी करणार उद्या ‘ट्वीटर वॉर’

पुणे : राज्य सरकारने मोठया दिमाखात 75 हजार पदांची भरती करू म्हणून जाहीर केले. मात्र, पोलीस भरती वगळता अन्य कोणत्याही पदांची भरती प्रक्रिया राबवली जात नाही. उलटपक्षी ज्या परीक्षा जवळ आल्यावर अचानक पणे सरकार रद्द करत आहे.

यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून पावले उचलावीत यासाठी राज्यभरातील विद्यार्थी सोमवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत ‘हॅशटॅग:#75000 मेगाभरती सुरु करा,’ असे ‘ट्वीटर वॉर’ राबविणार आहे.

राज्य सरकारने 75000 मेगाभरतीची नुसतीच घोषणा केली आहे. मात्र, त्यावर कोणतीच अंमलबजावणी केली जात नाही. रोज केवळ घोषणाबाजी सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन 2018-19 पासून अनेक जाहीर झालेल्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत.

काही वेळेस तर परीक्षेची तारीख काही दिवसांवर आली असताना सरकार अचानकपणे परीक्षा रद्द करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ऐन उमेदीतील वर्षे वाया जात आहे. मात्र, सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सरकारला जागे करण्यासाठी ‘ट्वीटर वॉर’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच वर्षांपासून जिल्हा परिषद पदभरती, आरोग्य विभाग पदभरती, शिक्षक पदभरती, नगरविकास विभाग पदभरती, वनविभाग पदभरती, पशुसंवर्धन पदभरती, एमआयडीसी पदभरती रखडल्या आहेत.

मागील जवळपास चार-पाच वर्षांपासून या परीक्षांची पदांची घोषणा झाली आहे. यातील काही परीक्षा तर अचानकपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्या आधी घ्या आणि नंतर नवीन घोषणा करा, अशी विद्यार्थ्यांची राज्य सरकारकडे मागणी आहे.
राज्य सरकारने 75 हजार पदांची मेगा नोकर भरती घोषणा केली. परंतु, पोलीस भरती सोडले तर अजून इतर कोणतीच भरतीची जाहिरात अद्याप जाहीर केली नाही.

दरम्यान, तीन-तीन, चार-चार वर्षांपासून फॉर्म भरलेले होते. त्याही परीक्षा हे सरकार अचानक रद्द करत आहे. लवकरात लवकर भरती चालू केली नाही तर आम्ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं परीक्षा समितीचे राहुल कवठेकर यांनी म्हंटल आहे.

तसेच राज्य सरकार झोपेचं सोंग घेत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी उद्या (सोमवारी) आम्ही राज्यभरातले सर्व विद्यार्थी ट्विटर ‘वार’ मोहिम राबवणार आहोत. या ट्विटर ‘वार’ नंतर हे झोपलेले सरकार जर जागे झाले नाही, तर आम्ही या सरकारला तीव्र आंदोलन करून जागे करणार असल्याचं महेश घरबुडे यांनी इशारा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube