कालीचरण महाराज ‘या’ दिवशी अहमदनगरमध्ये येणार
अहमदनगर : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (Ahmednagar) शहराजवळील बुरुडगाव येथे असलेल्या आशुतोष महादेव मंदिरात कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कालीचरण महाराज व करवीरपीठाचे शंकराचार्य 17 फेब्रुवारीला अहमदनगर शहर व बुरुडगाव येथे येणार आहेत, अशी माहिती राहुल दरंदले महाराज यांनी दिली.
बुरुडगाव येथील आशुतोष महादेव मंदिर येथे सालाबाद प्रमाणे त्रिदिनीय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम होतील. या सोहळ्याची सुरुवात 17 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता बाईक रॅलीने होईल. या रॅलीचा प्रारंभ इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला कालीचरण महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल.
ही रॅली बुरुडगाव येथे आल्यावर मंदिर परिसरात कालीचरण महाराज व शंकराचार्य यांची भाषणे होतील. या सोहळ्यात आळंदीचे योगेश जाधव महाराज, ज्ञानेश्वर तांबे महाराज, कान्होबा मोरे महाराज व निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची कीर्तने होणार आहेत, अशी माहिती बापुसाहेब कुलट यांनी दिली.