कर्डिले-सातपुते वाद उफाळला : केडगावला पुन्हा जुन्या जखमांची आठवण
अहमदनगरः केडगाव हे नगर शहरातील उपनगर. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहित आहे. कारण म्हणजे तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद होय. पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील वादातून येथेच दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या केडगावमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सातपुते यांनी शहरात दडपशाही, दहशत सुरू असल्याचा आरोप केला आहे. या घटनेतून केडगावच्या पुन्हा जुन्या घटना समोर आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी एका लग्नामध्ये अक्षय कर्डिले व ओंकार सातपुते यांच्यात किरकोळ वाद झाला होता. एकमेंकाना धक्का दिल्याने वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यातून नगर तालुका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कर्डिले यांच्या समर्थकाने दाखल केला आहे. यात दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार व त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. तू खूप कर्डिलेंचे उधो उधो करतो, त्यांचे फोटो व भाजप पक्षाच्या पोस्ट करतो, असे म्हणून मारहाण केली, अशी फिर्याद आहे. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच सातपुते यांच्या केडगाव येथील हॉटेलवर दगडफेक झाली. त्यात अक्षय कर्डिले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
या भागात कोतकर व सातपुते यांच्यात कायम राजकीय संघर्ष राहिला आहे. कोतकर हे कर्डिलेंचे व्याही आहेत. त्यामुळे त्यांचा संबंध येतोच. या भागात नेहमी राजकीय वाद निर्माण होतात. त्यातून एकमेंकाविरोधात गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे. सातपुते या भागातून नगरसेवकही राहिलेले आहेत.
…वरना वक्त के पहले फकिर, गुलाबराव पाटलांची खास शैलीत टीकेची झोड
यापूर्वी या भागात सातत्याने राजकारणातून वाद होत असतात. यापूर्वी या भागात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर व त्यांचे दोन भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. संदीप कोतकर हे कारागृहात शिक्षा भोगत असताना या भागात २०१८ मध्ये महानगरपालिकेची पोटनिवडणूक लागली होती. ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
त्यात सेनेचा उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याच दिवशी या भागात वसंत ठुबे व संजय कोतकर या दोन शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या कोतकरांनी घडवून आणल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. कोतकर कुटुंबातील काही सदस्यांसह यात शहराचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे वडिल अरुण जगताप, तेव्हा आमदार असलेले शिवाजी कर्डिले यांचेही नाव गुन्ह्यात होते. हा प्रकरण राज्यभरात गाजले होते. स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षातील इतर नेत्यांना लक्ष घातले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे तीन महिने कारागृहात होते. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सीआयडीने तपासानंतर न्यायालयात सांगितले होते.
माजी आमदार अनिल राठोड हे सातत्याने कोतकर, जगताप, कर्डिले यांच्याविरोधात आक्रमक राहत होते. तिघांवर ते दहशत, दादागिरीचे आरोप करत होते. आता पुन्हा एकदा हे आरोप शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते हे करू लागले आहेत. या वर्षाच्या शेवटी महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्याची राजकीय किनार या घटनेला असू शकते, असे बोलले जात आहे. परंतु हा वाद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात हे नक्की दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. त्यातून कर्डिले, जगताप, कोतकर यांना घेरण्याची संधीही विरोधक सोडत नाहीत.