Milind Deora : काँग्रेस का सोडली? देवरा म्हणाले, काँग्रेस सोडताना भावूक झालो होतो पण..
Milind Deora : लोकसभा निवडणुकीच्या आधी (Lok Sabha Election 2024) राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ तीन मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. नंतर मुंबई काँग्रेसमधील आणखी एक नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. या घटना ताज्या असतानाच मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेलेली असतानाच मिलिंद देवरा यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
कोल्हापूर येथे शिवसेनेचे (शिंदे गट) महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात मिलिंद देवराही सहभागी झाले आहेत. यावेळी देवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं भरभरून कौतुक केलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस सोडण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर देवरा यांनी जास्त बोलणे टाळले. तो एक मोठा विषय आहे. त्यावर मला एक पुस्तक लिहावं लागेल अशा सूचक शब्दांत त्यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले.
मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी : शिंदेंना दिल्लीत मिळणार ‘हुशार’ चेहरा
काँग्रेसमध्ये असे काय घडले की दिग्गज नेते बाहेर पडू लागले आहेत. या प्रश्वावर देवरा म्हणाले, इतिहासात काय घडलं याचा विचार आता आम्ही करत बसणार नाही. आम्हाला आमचं भविष्य महत्वाचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेत एका कुटुंबासारखं वातावरण आहे. देशाचा विचार केला तर फक्त भाजप आणि राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोनच लोकतांत्रिक पक्ष आहेत. काँग्रेस सोडताना मी भावूक झालो होतो हे खरं आहे. पण, शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिवेशनात आल्यानंतर मला आनंद होत असल्याचे देवरा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.