‘पंकजाताई, तुमच्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका’; ‘सकल मराठा’ च्या नेत्याचे प्रत्युत्तर
Maratha Reservation : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार (Mauli Pawar) यांनी मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पंकजाताई तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुमंच खरंच मराठा समाजावर प्रेम असेल तर मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातून पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी तुम्ही करा. हा सकल मराठा समाज तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, अशा शब्दांत पवार यांनी मुंडे यांना प्रत्युत्तर दिले.
Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
पवार यांनी यावेळी एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना आपण (पंकजा मुंडे) मराठा आरक्षण समितीत होतात. आपण कॅबिनेट मंत्री असताना देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आपण किती पाठिंबा दिला होता हे मराठा समाज चांगलेच जाणून आहे. त्यामुळे तुमच्या राजकारणासाठी मराठा तरुणांच्या भावनांशी खेळू नका.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. बीडमध्येही मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चातही तुम्ही सहभागी नव्हता. आज मात्र फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी असे वक्तव्य करत आहात. असलं कोरडं प्रेम तुम्ही मराठा समाजावर दाखवू नका, असेही पवार यांनी सुनावले.
आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही; पंकजा मुडेंनी बाहेर काढलं मराठा कार्ड
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?
बीड येथील सभेला संबोधित करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, आता राजेंद्र म्हस्के मला म्हणाले, ताई फेटा बांधा. पण, मी म्हटलं, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं, मी गळ्यात कोणताही फुलाचा हार घालणार नाही. त्या म्हणाल्या, आपल्याला दूध पोळलेलं आहे. त्यामुळं आता ताकही फुंकण पिण्याची वेळ आली आहे. 2024 हे इतिहास घडवणारं, म्हणजे, इतिहास बदलवणारं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांची नि:स्वार्थ साथ मला पाहिजे.