“विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी एका एकाला तुरुंगात घाला”, सदाभाऊंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Sadabhau Khot Statement on Opposition Parties : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत सध्या एकामागोमाग (Sadabhau Khot) एक वादग्रस्त विधाने करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ईडीची गती वाढवा गडी एकतर आला पाहिजे नाहीतर घाबरून मेला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी एका एकाला तुरुंगात घाला असे वक्तव्य खोत यांनी इचलकरंजीतील एका सभेत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
जे जे गडी विरोधात आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरुवात करा. सगळे गडी रांगत रांगत चालायला लागतील. पण सरकार फक्त भीती दाखवते आणि सोडून देते. असं करू नका, असे वक्तव्य खोत यांनी या सभेत केले. याआधीही त्यांनी अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मात्र या वक्तव्यांवरून त्यांनी अजून तरी माघार घेतलेली नाही.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका करताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता. “हे म्हातारं लय खडूस हाय, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय, अजितदादा किल्लीकडं बघून बघून म्हातारं झालं, दादाच्या लक्षात आलं की आता हे म्हातारं काय किल्ली देत नाय, त्यामुळं आता दादा किल्लीला लोंबकळत म्हणतय ही किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाय” अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी दोन्ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधावर टोलेबाजी केली होती. तसंच, आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही प्रपंच कधी करायचा म्हातारा झाल्यावर करायचा का? असा प्रश्न उपस्थित करून हा प्रपंच करण्यासाठी दादा महायुतीमध्ये आल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले होते.
म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय; सदाभाऊंचा पवारांवर गावरान तडका