सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली; सुजय विखेंनी डागली तोफ

सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली; सुजय विखेंनी डागली तोफ

Sujay Vikhe Said Sena leaders sacrificed themselves for power: पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व विखे गटाच्या बरोबर सभा गाजवत फिरणारे औटीनी मोर्चा बदलल्याने तालुक्यात भाजपची सर्व मदार विखे गटावर आली आहे. अशा स्थितीत आज खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) पाटील आज पारनेर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करल्याचा आरोपही त्यांनी नाव न घेता केला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली आहे. कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी हा स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारनेर तालुक्यांमध्ये इतर कोणालाही दडपशाही गुंडागर्दी गुन्हेगारी खपवून घेतली नाही, अशा कडवट शिवसैनिकांची ही परीक्षेची वेळ आहे. त्या शिवसैनिकांनी निर्णय घ्यावा, की आपला स्वाभिमान दुसऱ्याच्या पायावर गहाण ठेवायचा की स्वतः च्या ताकतीवर, स्वबळावर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेबरोबर यायचं. जो निर्णय ते घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी सांगितले.

राहुल कुल सावध रहा… संजय राऊत येत आहेत!

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमित्त पत्रकारांशी खासदार विखे यांनी संवाद साधला. पुढे म्हणाले, मी खासदार आहे. मला या तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोरगरीब जनतेने निवडून दिलेले आहे. ठेकेदारांकडून हप्ते घेण्यात आले नाहीत. थेट ग्रामपंचायतच्या सरपंचांना कामे दिली. यापूर्वी ठराविक लोकांनाच कामे दिली जात. डोंगर गायब करण्याचे काम उत्खननामध्ये केली गेली. मी या भागाचा खासदार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग बाहेरचा कोण?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पारनेर तालुक्यात जी युती आता समोर आली आहे, ती एका दिवसात झालेली नाही. नगरपंचायत निवडणुकीपासून या गुप्त बैठका सुरू होत्या. आता फक्त ती जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आता जनतेने ठरवावे, कोणत्या विचाराबरोबर आपल्याला रहायचे. मागील साडेतीन वर्षांत अधिकार्‍यांना दमदाटी व मारहाण, वाळू व गौण खनीज उपसा, मनमानी कारभार असे प्रकार सुरू होते. हा त्यांचा विचार आहे. दुसरीकडे सुविचार, तालुक्यात विकासाची कामे करण्याची मानसिकता असलेला विचार आहे. अगोदर जनतेमध्ये संभ्रम होता. मात्र आता दोघे एक आहेत. त्यामुळे ही निवडणूक बाजार समितीपूरती मर्यादित नाही तर तालुक्याचे भवितव्य ठरविणारी आहे. आम्ही दिलेले उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे, गुन्हे दाखल नसलेले, अवैध धंदे न करणारे आहेत. त्यामुळे आता तालुका कोणाबरोबर राहील, ते या निवडणुकीतून दिसेल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube