राहुल कुल यांचे निलंबन करा, भाजप नेत्याची मागणी; कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र
(Rahul Kul) राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सांगितलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांनी ५०० कोटी अफरातफर केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करणार असल्याचं ताकवणे यांनी सांगितलं.
कुल यांच्याविरोधात भाजप-राष्ट्रवादी एकत्र
ताकवणे यांनी मागणी केलेली असतानाच दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राहुल कुल यांच्याविरोधात पुणे जिल्हा बँकेकडूनही कारवाईचे संकेत दिले आहेत. पुणे जिल्हा बँकेचे रमेश थोरात यांनी देखील कुल यांच्या कारखान्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा : Rahul Kul : राऊतांचा आरोप हा राजकीय नैराश्येतून, कुल यांचा पलटवार
राहुल कुल यांच्या कारखान्याकडे १७९ कोटी रुपयांचं कर्ज थकलं आहे. त्यामुळे नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं रमेश थोरात यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की सहा महिन्यापूर्वी त्यांनी ४५ दिवस मुदत मागितली होती पण अजूनही कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँक त्यांच्यावर कारवाई करणार आहे. रमेश थोरात यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दौंडमध्ये राहुल कुल यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर तब्बल 500 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आहे . 2016 ते 2022 या कालावधीत गळीत हंगाम बंद असतांना खुल्या बाजारात साखरेची विक्री केल्याचं या पत्रात म्हटलंय. भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवत आहे. शेतकरी लुटला गेलाय, हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लॉन्डरिंग व्यवहार आहे. नि:पक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर आरोप केल्यानंतर कुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा पूर्णपणे राजकीय हेतूने केलेला आरोप आहे. त्यांच्या राजकीय नैराश्येतून त्यांनी हा आरोप केला आहे. तसेच ज्यांच्याकडे या सर्व प्रकरणाचे पुरावे जातील ती संस्था याची चौकशी करेल. चौकशीतून काय समोर येते ते पाहू, असे कुल म्हणाले आहेत. तसेच आमची सहकारी संस्था आहे. त्यामुळे लोकशाहीत असे आरोप होत असतात. आम्हाला चौकशीसाठी 12 महिने 24 तास तयारचं रहावे लागते, असे कुल म्हणाले आहेत.