पुतण्याचा काकाला धक्का! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत तुतारी फुंकणार?
Anil Sawant : विधानसभा निवडणूक (Assembly Election) जाहीर होण्याआधीच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीकडून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता सोलापुरातून मोठी राजकीय घडामोड समोर आलीयं. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे अनिल सावंत (Anil Sawant) तुतारी फुंकणार असल्याची शक्यता आहे. कारण अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीयं. त्यामुळे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चितच मानलं जात आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
अनिल सावंत यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलायं. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आरोग्य शिबीरांसह अनेक कामे केली आहे. मागील 30 ते 40 वर्षांपासून मी या भागात राहत असून भैरवनाथ साखर कारखाना चालवत आहे. शिवसेना पक्षाचं कोणतंही पद माझ्याकडे नसून माझी विचारधारा आणि काम वेगळं आहे, शरद पवार यांची विचारधारा मला मान्य आहे त्यामुळेच मी या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली असल्याचं अनिल सावंत यांनी सांगितलंय.
सॅमसंगचे कर्मचारी मागं हटेनात; पोलिसांनी 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण
तसेच मंगळवेढा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होत असते, यंदा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा निर्धार अनिल सावंत यांनी केलायं. आगामी विधानसभा निवडणुकीत जे लोकं माझ्यासोबत काम करण्यास इच्छूक आहेत, ते माझं काम करतीलच. येत्या काही दिवसांत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबतचा निर्णय घेणार असून नेमकं काय होईल, हे स्पष्ट होणार असल्याचं अनिल सावंतांनी स्पष्ट केलंय.
आज महात्मा गांधी जयंती! कोसो दूर अहिंसेची पाऊलवाट चालणारे बापू; काय होते जगण्याचे विचार?
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार आणि जयंत पाटलांच्या आशिर्वादाने उमेदवारी मिळाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच होणार असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शंभर मीच निवडून येणार असल्याची खात्री अनिल सावंत यांनी दिलीयं. अद्याप अनिल सावंत यांनी शरद पवार गटात प्रवेश केला नसून पुढील काळात चर्चा करुनच ते निर्णय घेणार आहेत. पुढील काळात अनिल सावंत शिवेसना सोडून शरद पवार गटात गेल्यास हा तानाजी सावंतांना मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.