…तर मी 2022 लाच एकनाथ शिंदेंसोबत गेलो असतो; ओमराजे निंबाळकरांनी वडिलांचा हत्या निकाल अन् पक्षांतरावर सगळच सांगितलं

हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आणि जयराजे निंबाळकर दोन्ही बंधू पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे.

News Photo   2026 06 21T163908.535

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा (Nimbalkar) गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेला निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गेला. विशेष म्हणजे, या खटल्यातील सर्वच आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर, ओमराजेंनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटलं. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेवरुन मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, अद्यापही त्यांची राजकीय भूमिका तळ्यात की मळ्यात अशीच आहे.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आणि जयराजे निंबाळकर दोन्ही बंधू पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. वडिलांची हत्या झाली त्याप्रमाणेच कालचा दिवस आमच्या कुटुंबासाठी होता, सगळे ओक्साबोक्सी रडत होते. यावेळी, हत्या प्रकरणाच्या निकालावर बोलताना ओमराजे निंबाळकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. समद काझी यांचा मुलगा दीड वर्षाचा होता, त्याने आपल्या वडिलांचा चेहराही पाहिला नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तर, राजकीय भूमिकेबाबत मात्र ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगलं आहे.

सोशल मीडियावरुन ट्रोल केल्यावरही ओमराजे व्यतीत झाल्याचं दिसून आलं. वडिलांच्या हत्येसाठी मी गेलो असं काहीजण म्हटले, तसं असतं तर 2022 लाच गेलो असतो. त्यामुळे, ट्रॉलर्सने ट्रोल करताना विचार करायला हवा, तीन दिवसात मी एवढा वाईट झालो का? असा सवाल ओमराजेंनी विचारला. निवडणुकीत लोकसभा, विधानसभेला आम्हाला मतं पडली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही मशालच्या नावावर लढत होतो, सत्तेच्या पुढे आम्ही एकाही ठिकाणी निवडून आलो नाही, आम्ही एवढे वाईट होतो का? असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, ओम बिर्ला यांची भेट घेतली का? वेगळा गट स्थापन करण्यासाठी स्वाक्षरी केली का? या सर्व प्रश्नावर ओमराजे निळबाळकर यांचे मौन पाहायला मिळालं, उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता का? एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का? कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्या भेटीत काय झालं? या सर्व राजकीय प्रश्नांवर ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगलं आहे. तर, मी कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आणि त्यानंतरच पुढील भूमिका जाहीर करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us