भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही 1 रुपयांत पीकविमा दिला : कृषिमंत्री कोकाटे

Manikrao Kokate on Crop Insurance : पीकविमा योजनेत मोठा भ्रष्टाचार (Crop Insurance) झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी (Manikrao Kokate) या योजनेबाबत मोठे विधान केले आहे. पीकविमा योजना यशस्वी झाली पाहिजे. योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारला पीकविमा योजना बंद करायची नाही. परंतु यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी काही तरी निर्णय घ्यावे लागतील. तसा विचार केला तर भिकारी सुद्धा आज एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
मंत्री कोकाटे यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीकिविमा योजनेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एक रुपयात पीकविमा योजना बंद करून शंभर रुपयांत पीकविमा योजना आणण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे असे विचारले असता कोकाटे म्हणाले, पीकविमा योजना यशस्वी झाली पाहिजे. योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारला पीकविमा योजना बंद करायची नाही. परंतु, पीकविम्यात असलेले गैरप्रकार थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील. पण काय निर्णय घ्यायचे या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. पण पीकविमा योजना आजिबात बंद होणार नाही.
माणिकराव कोकाटे हे उपरे; माझ्या आग्रहामुळे शरद पवारांनी त्यांना..छगन भुजबळांचा कोकाटेंवर वार
पीकविमा योजनेत सुधारणा गरजेची
पीकविमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा एजन्सींना जास्त फायदा होतो हे खरं आहे. तसा विचार केला तर भिकारी सुद्धा आज एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. बाकीच्या राज्यातील लोकांनी सुद्धा अर्ज केले होते. त्यामुळे अर्जांची संख्या खूप वाढली. पीकविमा योजना चांगली आहे असे वाटले होते. प्रत्यक्षात ज्यावेळी चौकशी करण्यात आली तेव्हा चार लाख अर्ज नामंजूर करण्यात आले. यात सरकार कुठेच अडचणीत आलेले नाही. परंतु, असे का होत आहे याची चौकशी सुरू आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यात काय सुधारणा करायच्या याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठरवले जाईल.
कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे आकृतीबंध तयार करून नवीन भरती संदर्भात सरकार विचार करेल. कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांना संपर्क साधता यावा यासाठी एका सिरिजमध्ये नंबर देण्यात येणार आहे. कृषिमंत्र्यांपासून थेट शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत हा कायमस्वरुपी नंबर असेल असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी कृषीमंत्रीपद अन् पालकमंत्रीपद भाड्याने दिलं; बीड जिल्ह्यावर ही वेळ..धस यांचा आरोप