पतंगराव कदम एक जिंदादिल व्यक्तिमत्व, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
पुणे : पतंगराव कदम एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते, असं वक्तव्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnvis) यांनी एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम(Patangraokadam) यांच्या जन्मदिनानिमित्त भारती विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे (Serum Institute) अदर पुनावाला यांना कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल ‘पतंगराव कदम’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, पतंगराव कदम जिंदादील व्यक्तिमत्व होते. प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची त्यांच्यात ताकद होती. तसेच शून्यातून विश्व निर्माण करण्याचीही ताकद त्यांच्यात होती. कदम आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.
कोरोना काळात अदर पुनावालांसह त्यांच्या टीमने भारत देश काय आहे, हे जगाला दाखवून दिलंय. त्यांच्या कार्याचा आणि सिरमचा आम्हांला आदर वाटतो. देशात त्यांनी उच्चशिक्षणाचा विस्तार केला आहे. पतंगराव कदम यांच्या नावाने असलेला पहिला पुरस्कार अदर पुनवाला यांना दिला ते अतिशय समर्पक असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. भारती विद्यापीठ सारख्या संस्थांनी एक मिशन म्हणून हे काम हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेलं आहे.
आज जगाने आपल्याला एक मोठी संधी दिलीय, चीनकडे संशयाने पाहिले जात असताना भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येत असून ही जी वेळ आज भारताला मिळालीय त्याचा आता सदुपयोग करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, समृध्दी महामार्ग(Maharashtra Samruddhi Mahamarg) झाला असून तो पुण्यालाही जोडणार आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ संस्थेने आपला मोर्चा आता विदर्भातही वळवावा, अशी मागणी फडणवीस यांनी केलीय.