Chinchwad By Election : पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी लढवणार पाेटनिवडणूक…
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने माेर्चेबांधणी सुरु केली आहे. कसबा काँग्रेस, तर चिंचवडची पाेटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कसबा मतदार संघासाठी काँग्रेसने आमदार संग्राम थाेपटे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. महाविकास आघाडीची उद्या मुंबईत बैठक हाेणार आहे. त्यात यावर शिक्कामाेर्तब होण्याची शक्यता आहे. कसब्यात काँग्रेसकडून आरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल कलाटे यांची नावे आघाडीवर आहेत.
भाजपचे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दाेन आमदारांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील 215- कसबा पेठ व 205- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केला आहे. पोटनिवडणुकीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 राेजी निवडणूक हाेणार असून 2 मार्च राेजी मतमाेजणी हाेणार आहे.
कसबा पेठ मतदार संघासाठी 5 नावांची चर्चा सुरु आहे. शहराध्यक्ष आरविंद शिंदे, रवींद्र धगेंकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे आणि संगीता तिवारी हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा पेठ विधानसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कसबा पेठ या मतदार संघातील मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आरविंद शिंदे हे आवघ्या 20 ते 25 हजार मतांनी ते पराभूत झाले हाेते. त्यामुळे या निवडणुकीसाठी शहर काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे.