देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण : महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर
Ravindra Chavan-मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईसह राज्यातील तब्बल 25 महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्यात.
Devendra Fadanvis and Ravindra Chavan: महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालंय. मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईसह राज्यातील तब्बल 25 महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्यात. मोजक्याच ठिकाणी भाजपला महायुतीतील पक्षांनाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करायचीय. पण यशामागे दोन धुंरदर चेहरे आहेत. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे त्यांचे ‘ब्ल्यू-आईड बॉय’ समजले जाणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण. या जोडगोळीचा हे यश कसे मिळविले हेच जाणून घेऊया…
विधानसभेच्या विजयात मोलाचा वाटा
लोकसभा आणि विधानसभेत रविंद्र चव्हाणांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. कारण लोकसभेला भाजपला राज्यात फटका बसला होता. पण कोकणात मात्र सहा पैकी पाच लोकसभेची जागा भाजपने जिंकत बालेकिल्ला राखला. त्या यशामागे रविंद्र चव्हाण हेच होते. कारण कोकण विभागातील प्रचाराची संघटनात्मक धुरा त्यांच्या होती. याच यशामुळे विधानसभेसाठी रविंद्र चव्हाण हे स्टार प्रचारक झाले. राज्यात त्यांच्या झंझावती सभा झाल्यात. भाजपला घवघवीत यश मिळाले.
पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्यावर भर
गेल्या वर्षभरात संघटन पर्व प्रदेश प्रभारी, भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशा तीनही भूमिकांमधून रविंद्र चव्हाण यांनी पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी जीवाचं रान केलं आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यभरात दौरे करत आणि कार्यशाळा घेतल्या. संघटन पर्वादरम्यान राबवण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून एकूण दीड कोटी प्राथमिक सदस्य आणि दीड लाख सक्रीय सदस्य नोंदणी केली. पन्ना प्रमुख, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख अशी मायक्रो लेव्हलवर भाजपच्या पक्ष संघटनेची फेररचना करण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे चव्हाणांनी ग्राउंड लेव्हलवर केलेल्या मायक्रो मॅनेजमेंटचं हे यश आहे.
संघटना बांधणीत टीका पण…
संघटना बांधणी करताना रविंद्र चव्हाण यांच्यावर सातत्याने टीका झाली, मात्र त्यांनी टीकेकडे लक्ष न देता आपले काम सुरूच ठेवले. यामुळेच भाजप मजबूत पक्ष ठरलाय. तेच नगरपालिका आणि महानगरपालिकेत यश मिळण्याचे एक कारण आहे. तब्बल नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने भाजपचे कार्यकर्त्यांमुळे संचार होता. पक्षाची ताकद बघता स्वबळावरची भाषा कार्यकर्ते करत होते. परंतु कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून चव्हाणांनी त्यांचा नाराजी दूर केलीच. त्यामुळे कल्याण-डोंबिवली व ठाण्यात युती होऊ शकले. शिवाय फडणवीस आणि चव्हाण हे राज्यभरात गेले. तेथील कार्यकर्त्यांना समजून सांगितले. त्यामुळे भाजपात मोठी बंडखोरी दिसून आले नाही.
महाराष्ट्र पिंजून काढला, फडणवीसांपाठोपाठ चव्हाणांच्या सर्वाधिक सभा
नगरपालिकांसाठी रविंद्र चव्हाण आणि फडणवीस यांच्या जोडगोळीने महाराष्ट्र सभा घेतल्या. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत फडणवीसांनी 37 सभा घेतल्या. तर त्या पाठोपाठ चव्हाणांनी तब्बल 35 सभा झाल्या. या सभा सर्वच महानगरपालिकांमध्ये झाल्या. त्यातून विजयाचे गणित आखले गेले. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ दिलंय. त्यातून सरकारचे विकासकामे, पक्षाचा विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली. हे कारण भाजपच्या विजयामागे आहे.
विरोधकांचा खोटा प्रचार पण थेट प्रत्युत्तर
प्रचारादरम्यान चव्हाण यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यांना चालता येत नव्हतं. पँट घालणं देखील अवघड झालं. या शारीरिक व्याधीनंतरही रविंद्र चव्हाण यांनी प्रचाराची तोफ थंडावू दिली नाही. सोवळं नेसून विविध ठिकाणी प्रचार सभा आणि प्रचार रॅलीमध्ये रविंद्र चव्हाण सहभागी झाले. पण तो मुद्दा विरोधकांनी उचलला. खोटा प्रचार सुरू केला. या पेहरावावरूनही ‘रसमलई इफेक्ट’ असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तेव्हा जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते असं म्हणत आदित्य ठाकरे यांचा लुंगीमधला फोटो शेअर केला आणि ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी भाजप समर्थ आहे हे दाखवून दिले.
विरोधकांकडून नामोहरम करण्यासाठी अनेक प्रयत्न
रविंद्र चव्हाण यांचा प्रचाराचा धडाका बघून विरोधकांनी त्यांना नामोहरम करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उल्हासनगर येथील सभेत सिंधी समाजाचे धर्मगुरू साईं वसनशाह दरबाराचे प्रमुख छोटू हिंदू साईं गुरुमुखदास जगियासी यांना वंदन करतानाचा फोटो इम्तियाज जलील म्हणून व्हायरल करत एमआयएम नेत्याच्या पाया पडल्याचं भासवण्यात आलं. तेव्हा त्यावर रविंद्र चव्हाणांनी काहीही उत्तर न देता आपलं काम सुरु ठेवले. कार्यकर्त्यांनी मात्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत वस्तुस्थिती समोर आणली.
महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी मार्गदर्शन आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मैदानावरची झंझावाती अंमलबजावणी, या दोन नेतृत्वांचा मेळ बसला आणि भाजपला महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. ही केवळ एका निवडणुकीतील विजयाची गाथा नसून, ‘फडणवीस व चव्हाण’ या जोडगोळीने महाराष्ट्राच्या राजकारणात विजयाची मालिका सुरु ठेवलीय. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्येही ‘फडणवीस व चव्हाण’ फॅक्टर भाजपाला यश मिळवून देईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
