जात सांगितल्याशिवाय खतं मिळेना; जातीचा आणि शेतीचा संबंध काय? जयंत पाटलांचा सवाल

  • Written By: Published:
Untitled Design (17)

मुंबई : आतापर्यंत नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते. आता शेतीसाठी खत (Fertilizer) घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक केलेलं आहे. विक्रेत्याला जात सांगितल्याशिवाय शेतकऱ्यांना यापुढे खत मिळणार नाही. कारण खत खरेदीसाठी ई-पॉसमध्ये (E-POSS System) जातीचा रकाना देण्यात आला आहे. हे ऑप्शन निवडल्याशिवाय खत खरेदीची प्रक्रिया पुढे जात नाही. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.

ई-पॉस मशीनमध्ये जात टाकल्याशिवाय खत मिळत नाही हा बदल 6 मार्चपासून झाला आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे. शेतकरी वर्गात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक असतात. शेतकऱ्यांना जात विचारने आणि मग त्याला खत देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. वर्णभेदाची किती आग्रही भूमिका सरकारने घेतली आहे हे यातून निष्पन्न होते. शेतकऱ्यांना जात विचारण्याचे काही कारण नाही. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सरकारने अशी भूमिका घेतली असेल तर ती रद्द केली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.

आमदारांच्या डोक्यावर भोपळे; सरकारी बजेटविरोधात महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन

कोणत्या जातीचे किती शेतकरी आहेत. याची माहिती गोळाकरून त्या दृष्टीने राजकारणाची पुढची पावले टाकायची असे कदाचित राज्य सरकारचे धोरण असू शकते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. जातीचा, खताचा आणि शेतीचा काही संबंध नाही. या संदर्भातील माहिती घेऊन विधानसभेत यावर सरकारला जाब विचारला जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us