लक्ष्मण जगताप यांची खासदार व्हायची इच्छा अपूर्णच राहिली

  • Written By: Published:
लक्ष्मण जगताप यांची खासदार व्हायची इच्छा अपूर्णच राहिली

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. मागील काही महिन्यापासून ते आजारी होते.

पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. काही दिवसापूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. 

मागच्या वर्षी लक्षणीय पद्धतीने गाजलेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी ते मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.

काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात

पिंपरी चिचंवड परिसरातील पिंपळे गुरवचे रहिवासी असलेल्या लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व महापालिकेत केले.

१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. 

त्यांनतर शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. पुढे २००० मध्ये पिंपरी चिंचवडचे महापौर देखील झाले. दोन वर्ष त्यांनी या पदाच कामकाज सांभाळलं.

नाराजी आणि बंडखोरी

२००४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला होता.

पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.

त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. त्यांनतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकतही त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढून निवडणूक जिंकली.

खासदार व्हायची इच्छा अपूर्णच राहिली

आपल्या राजकारणाची सुरुवात महापालिकेतून करणारे जगताप आमदार झाले. पण त्यांची खासदार व्हायची इच्छा अपूर्ण राहिली. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते कि राजकारणात सर्वाना वाटत कि पुढे जात राहील पाहिजे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. 

मागच्या वर्षी देशभरात गाजलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप अगदी व्हीलचेअर वरून मतदान करायला पाहायला मिळाले. पक्षच्या विजयासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वांनी दखल घेतली होती. पण गेल्याच महिन्यात मुक्ता टिळक यांचं निधन झालं तर आज लक्ष्मण जगताप यांनी देखील आखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube