मुलुंडमध्ये राडा! भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप
Mumbai Lok Sabha : मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला. ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. भारतीय जनता पार्टीच्या वॉर रुममधून पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू आहे असा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
ईशान्य मुंबईत भाजपने मिहीर कोटेचा यांना तिकीट दिले आहे. तर महाविकास आघाडीने संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत होईल अशी चर्चा आहे. मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात मिहीर कोटेचा यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल
ज्यावेळी हा राडा झाला तेव्हा मिहीर कोटेचा पंतप्रधान मोदी यांच्या सभेला हजर होते. आम्ही पंतप्रधानांच्या सभेला जात असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी तोडफोड केली असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड यांनी कार्यालयाला भेट दिली. या घटनेची माहिती घेतली. यावेळी भाजप कार्यकर्ते कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या घटनेनंतर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप दानवेंनी केला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. आता या घटनेवरून राजकारणही जोरात सुरू झाले आहे.
BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या ‘मोदी की गॅरंटी’ जाहीरनाम्यात काय काय?