“नार्वेकर आहेत तिथेच सुखी राहू देत, माझ्या त्यांना शुभेच्छा”; उमेदवारीच्या चर्चांना शिंदेंचा फुलस्टॉप!
Eknath Shinde on Milind Narweakar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांना ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून उमेदवारीचा प्रस्ताव नार्वेकरांना दिल्याची चर्चा मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे. नार्वेकरांना खरंच अशी ऑफर दिली का याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच दिलं आहे. मिलींद नार्वेकरांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. त्यांच्याशी माझा संपर्कही नाही. ते उबाठा पक्षात आहेत. तिथेच त्यांना सुखी राहू देत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगत या चर्चांना शिंदेंनी पूर्णविराम दिला.
विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम सावलीसारखे वावरणारे, राजकीय निर्णयात सहभागी असणारे त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिंदेंकडून देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मिलींद नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफर शिंदे गटाने दिल्याची माहिती होती. तशा बातम्याही आल्या होत्या. परंतु, यात काहीच तथ्य नसल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
मिलींद नार्वेकर बाळासाहेब ठाकरेंपासून पक्षात काम करत आहेत. पक्षाची ध्येय धोरणे आणि महत्वाचे राजकीय निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असतो. उद्धव ठाकरे अडचणीत येतात त्यावेळी मिलींद नार्वेकर मदतीसाठी येतात. त्यामुळे ठाकरेंसाठी संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघसाठी भाजपही इच्छुक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. भाजपकडून मंत्री मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर आणि यशवंत जाधव इच्छुक आहेत. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित नाही. जागावाटपात मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबतही काही ठरलेलं नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
CM शिंदेंसाठी मुंबई अवघडच! शिंदेंच्या मनातील ‘त्या’ दोन नावांना ‘मनसे’चा तीव्र विरोध