अखिलेश शुक्लाचे ग्रह फिरले! खासगी गाडी, अंबर दिवा जप्त; कल्याणप्रकरणी कारवाई

अखिलेश शुक्लाचे ग्रह फिरले! खासगी गाडी, अंबर दिवा जप्त; कल्याणप्रकरणी कारवाई

Kalyan Attack Marathi Family : कल्याण शहरातील उच्चभ्रू सोसायटीत मराठी माणसांना मारहाण करण्यात आली. या वादाचे तीव्र पडसाद काल हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. माजोरड्यांचा माज उतरवणारच असे ठणकावून सांगितले होते. तर दुसरीकडे मराठी माणसांविषयी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लाचेही ग्रह फिरले आहेत. पोलिसांनी शुक्रवारीच त्याला अटक केली होती. यानंतर त्याच्या विरुद्ध कारवाईचं सत्रच सुरू झालं आहे.

अखिलेश शुक्ला हा एमटीडीसी मध्ये अकाउंटट पदावर आहे. मात्र तो स्वतःला सनदी अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीतील रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शुक्ला त्याच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून रुबाब करत होता. आता त्याचा हाच रुबाब पोलिसांनी उतरवला आहे. पोलिसांनी शुक्लाची खासगी गाडी जप्त केली आहे. अंबर दिवा देखील हस्तगत केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंबरनाथ वाघमोडे यांनी शुक्लाच्या वाहनाची तपासणी केली. या गाडीत असलेला अंबर दिवा जप्त केला.

“माजोरड्यांचा माज उतरवणारच” ‘कल्याण’ प्रकरणी फडणवीसांनी ठणकावलं!

आरटीओचीही वक्रदृष्टी

अखिलेश शुक्ला वापरत असलेली गाडी कल्याण आरटीओच्या रडारवर आली आहे. आरटीओने या गाडीला 9500 रुपयांचा दंड आकारला आहे. कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा लावला म्हणून हा दिवा जप्त करून गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीला साडेनऊ हजार रुपये दंड ठोठवला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपलेले असतानाही गाडी मागील चार वर्षांपासून रस्त्यावर धावत आहे. अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा लावला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गाडी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा.

सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर.. ; कल्याण राड्यावरून राज ठाकरेंचा कडक इशारा

या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसंच, घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube