मोर्चाआधीच धरपकड! पहाटे साडेतीन वाजता मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला घेतलं ताब्यात

MNS Morcha Avinash Jadhav Arrest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना (Avinash Jadhav) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सध्या काशिमिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई ठाणे (Marathi Language Row) भागात परप्रांतीय नागरिकांना मारहाण होत आहे. काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर परिसरात एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासह अन्य प्रकाराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून प्रतिमोर्चा काढण्याचे नियोजन केले जात होते. पोलिसांनी मात्र या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या जात होत्या. त्यानंतर आज पहाटे साडेतीन वाजताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचे घर गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. यानंतर मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मोर्चा निघणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सकाळी 10 वाजता हा मोर्चा बालाजी हॉटेल येथून सुरू होऊन मिरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार होती. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी देखील मोर्चाची तयारी केली जात होती. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि मोर्चेकऱ्यांत मोर्चाआधीच संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. नियोजित वेळेत आणि नियोजित ठिकाणी हा मोर्चा निघणारच असा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
आक्रमक हिंदुत्व अन् हिंदी विरोध..राज-उद्धव एकी काँग्रेसला डोकेदुखी
मोर्चा काढण्याचं कारण काय?
मीरा भाईंदर परिसरात मराठी माणसांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षांतील मराठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार देणे, मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे यांसह अन्य प्रकारांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.