Eknath Shinde: दावोसमध्ये मोठ्या उद्योगांशी सामंजस्य करार
पुणे: दावोसमध्ये (Davos) उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यातल्या विविध भागात उद्योग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.चा (Vasantdada Sugar Institute) पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल.
जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे. केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे नमूद करून साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे-शरद पवार
भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे.
हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो.
साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.