वडिल आणि मुलगा दोघेही मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, दोघांनाही खासदार म्हणून संधी, केंद्रीय मंत्रीपदी दोघांचीही वर्णी असे असताना कोणी काॅंग्रेस पक्ष सोडला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काॅंग्रेसवाले असाल तर त्यांना गद्दार म्हणाल आणि भाजपवाले असाल तर त्यांनी चांगली संधी शोधली, असे उत्तर असेल. तर विषय तुमच्या लक्षात असेलच. मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेश. काॅंग्रेसचा वारसा सोडून त्यांनी शिवसेनेचे भगवं उपरणे परिधान केले. यामागचे कारण कोणी काही सांगू पण त्यांचा हा प्रवेश दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी झालेला आहे. (Milind Deora joins Shivsena)
दक्षिण मुंबई हा देवरांचा परंपरागत मतदारसंघ. स्वतः मिलिंद यांनी तब्बल चार वेळा येथून निवडणूक लढवली. त्यापैकी दोन निवडणुकीत विजय आणि दोनमध्ये पराभव असे त्यांचे गणित राहिले. त्यांचे वडिल मुरली देवरा यांनी १९८० ते १९९९ या काळात तब्बल सहा निवडणुका येथून लढविल्या. त्यापैकी चार निवडणुका त्यांनी जिंकल्या. १९९६ आणि १९९९ या दोन निवडणुकांत भाजपच्या नेत्या जयवंतीबेन मेहता यांना मिलिंद देवर यांना पराभूत केले होते.
या मतदारसंघाचे नेतृत्व कोण केले होते, हे ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जाणारे काॅंग्रेसचे नेते स. का. पाटील हे येथील पहिले खासदार होते. येथून तब्बल चार वेळा खासदार असलेल्या पाटलांचा जाॅर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला होता. ही निवडणूक तेव्हा देशात गाजली होती. तरीही तुलनेने काॅंग्रेसचेच वर्चस्व या मतदारसंघावर राहिले.
तर काॅंग्रेसचा परंपरागात मतदार असलेलाआणि वडिलांनी बांधणी केलेल्या दक्षिण मुंबईमधून २००४ मध्ये मिलिंद देवरा यांना पहिल्यांदा येथून संधी मिळाली. ते पुन्हा २००९ मध्ये विजयी झाले. राहुल गांधी यांच्या जवळ ते स्वाभाविकपणे गेले. राहुल यांनी त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही बहाल केले होते. राहुल यांच्या किचन कॅबिनेटमधील नेत्यांत त्यांचा समावेश होता. पुढे २०१४ पासून काॅंग्रेसची स्थिती बिकट झाली. त्यातून २०१४ आणि २०१९ य सलग दोन निवडणुकांत देवरा यांना पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकल्या. या वेळी भाजप आणि शिवसेना यांची युती होती.
या मतदारसंघात उच्चभ्रू मलबार हिल पासून ते मोहम्मद अली जिना रोड या भागाचा समावेश होतो. अनेक महत्वाचे नेते येथून निवडून येतात. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा कुलाबा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ यांचा समावेश दक्षिण मुंबईत आहे. याशिवाय शिवडी, भायखळा आणि मुंबादेवी हे तीन विधानसभा मतदारसंघ यात आहेत. शिवडीतून शिवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत. ते सध्या आदित्य ठाकरेंसोबत आहेत. भायखळ्यच्या आमदार यामिनी जाधव या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. मुंबादेवी या मतदारसंघात काॅंग्रेसचे ज्येष्ठ आमदार अमीन पटेल आहेत.
शिवसेना आणि काॅंग्रेस यांच्यातील आघाडीला मिलिंद देवरा यांनी सुरवातीपासून विरोध केला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्यासारखे झाले. महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीची जागावाटप बोलणी सुरू झाल्यानंतर देवरा यांचा भडका उडाला. महाविकास आघाडीत शिवसेनेला झुकते माप देण्याच्या चर्चा आहेत. त्यात दक्षिण मुंबईची जागा पुन्हा शिवसेनेकडे जाणार असल्याचे दिसताच देवरा यांनी जागावाटपावर आक्षेप घेतला. पण काॅंग्रेस पक्षात त्याची कोणी दखल घेतली नाही. ही जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीत एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल, या अपेक्षेने त्यांनी शेवटी शिवसेनेत प्रवेश केला.
या महायुतीच्या जागावाटपात ही लोकसभेची जागा कोण लढविणार, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपकडून मंगलप्रभात लोढा हे सुद्धा लोकसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांनाही खासदारकीचे वेध लागले आहेत. त्यांचे अनेक फ्लेक्स संपूर्ण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत पहावायस मिळत आहेत. त्यामुळे मुळात शिंदे यांच्या शिवसेनेलाच हा मतदारसंघ सुटेल, याची काळजी देवरा यांना घ्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचे निश्चित होऊ शकेल. दुसरीकडे शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेल्या खासदारांत सावंत अग्रभागी आहेत. दिल्लीत ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे देवरांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना हा सावंत यांच्याशीच होण्याची दाट शक्यता आहे.
या मतदारसंघाची रचना आधी म्हटल्याप्रमाणे मुंबईचे काॅस्माॅपाॅलिटन स्वरूप दाखविणारी आहे. मलबार हिलसारखा उच्चभ्रू, परळ-लालबाग हा मराठी प्रभाव असलेला भाग येथे आहे. तसेच डोंगरीसारखा मुस्लिम बहुल परिसरही यात येतो. या मतदारसंघात काॅंग्रेसची मते तीन ते साडेतीन लाख मते निश्चित आहे. शिवसेनेला मानणारी मतांची संख्याही लक्षणीय आहे. भाजपला निष्ठावंत असलेली गुजराती, हिंदी भाषक मतांचीही संख्या चांगली आहे.
येथील मुस्लीम मतदार हा शिवसेनेकडे झुकल्यास सावंत यांचे पारडे जड होऊ शकते. पण पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर मतदार खूष आहेत. राममंदिरामुळे वातावरण देशभर प्रभावित आहे, या वातावरणाचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. शिंद-फडणवीस आणि अजित पवार या तिघांचे ट्रिपल इंजिन येथे प्रभाव टाकू शकेल, असाही होरा आहे. त्यामुळेच देवरा यांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकारला. गेल्या दोन निवडणुकांतील पराभवाचे उट्टे त्यांना काढायचे आहेत.
देवरा यांना खरेतर २०१९ मध्येच भाजपमध्ये येण्याच इच्छा असल्याची चर्चा होती. पण राहुल गांधी यांनी त्यांना रोखल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या म्हणण्यानुसार देवरा यांनी २०१९ मध्येच उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधा शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अरविंद सावंत यांची उमेदवारी रद्द करून ती देवरा यांना देण्यास ठाकरेनी नकार दिल्याचा दावा राऊत यांनी केला.
आता देवरा यांना पुन्हा संसदेत जायचे आहे. मोदी, शिंदे आणि फडणवी यांचे कौतुक करून त्यांनी आपला इरादा अप्रत्यक्षरित्या जाहीर तर केला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे इंग्रजीत प्रभावीपणे बाजू मांडणारा नेता नाही. देवरा यांच्यानिमित्ताने फाडफाड इंग्रजी बोलणारा नेता त्यांना मिळाला आहे. देवरा यांची समजा लोकसभेची गाडी हुकलीच तर जून महिन्यात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यातील एक जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सहज मिळू शकते. त्यामुळे देवरा यांच्यासाठी राज्यसभेचा पर्याय आहेच. त्यामुळे देवरा यांच्यासाठी शिवसेनेत प्रवेश हा आइसिंग आॅन केक ठरू शकतो. पाहू या सत्तेच्या पटावरील मांडणी कशी होती ते…