Mumbai : 4 महिन्यांचं बाळ हातातून निसटलं अन् वाहून गेलं, आईचा आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र…

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना एका व्यक्तीच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (A four-month-old baby was swept away in the water while the Ambernath local stopped between Thakurli and Kalyan)
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण या स्थानकांदरम्यान थांबली होती. सुमारे दोन तास वाहतूक सुरु न झाल्याने प्रवासी उतरून चालत कल्याणच्या दिशेने निघाले. त्यात 4 महिन्यांच्या एका बाळाला घेऊन त्या बाळाचे काका आणि आई चालत होते. नाल्याच्या बाजूच्या पट्टीवरुन चालत असताना अचानक काकांच्या हातून 4 महिन्याचे बाळ निसटले आणि नाल्यातील वाहत्या पाण्यात पडले.
अंबरनाथ लोकल ठाकुल्री – कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याण च्या दिशेने चालत होते त्यात एक छोटा बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते अचानक त्या काका च्या हातून चार महिनाचा बाळ हातातून सटकला #kalyan #Mumbairains #MumbaiRainsWithMidday pic.twitter.com/9P28gRdpOd
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 19, 2023
नाल्याचे पात्र मोठे असल्याने आणि पाण्याला वेग असल्याने बाळ वाहून गेले आहे. सध्या रेल्वे पोलीस आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने बाळाचा शोध सुरु आहे. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपस्थित एका प्रवाश्याने या घटनेचा व्हिडीओ शूट करुन तो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. यात ही माता आक्रोश करताना दिसून येत असून तिचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.
रेल्वे वाहतूक विस्कळीत :
आज सकाळपासूनच मुंबईसह, ठाणे, कल्याण, अंबरनाथ या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अंबरनाथ शहरातील सर्व नदी-नाले तुडूंब भरुन वाहत आहे. या नाल्यांचे पाणी रुळावर आले आहे, त्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. सुरुवातीला अर्धा तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यानंतर एक लोकल सोडून पुन्हा अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अंबरनाथ येथील बी केबिन परिसराजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वेमार्ग धोकादायक बनला आहे.
सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत एकही लोकल किंवा एक्स्प्रेस या मार्गावरुन गाडी सोडण्यात आलेली नाही. रेल्वे रुळाखाली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कामगारांनाही पाचारण करण्यात आले होते, मात्र पावसाचा जोर कमी न झाल्याने या कामगारांनाही पाऊस थांबण्याची वाट पहावी लागली. अद्यापही लोकलची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत असून दुपारपासून प्रवासी स्थानकांवरच खोळंबले आहेत.