पार्सलचा बहाणा आणि मुंबई मनपा आयुक्त भिडेंचं व्हॉट्सॲप हॅक! अनोळखी व्यक्तीने सांगितलेले ‘हे’ कोड डायल करू नका

BMC Commissioner Bhide's WhatsApp hacked मुंबई महापालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.

WhatsApp Hacked

Parcel scam: Mumbai Municipal Commissioner Bhide’s WhatsApp hacked! Do not dial ‘this’ code provided by a stranger : मुंबई महापालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. बनावट कुरिअर पार्सलच्या नावाने आलेल्या फोनचा आधार घेत आरोपींनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांच्या मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुरू केले. त्यानंतर भिडे यांच्या नंबरवरून व्हॉट्सॲपचा ताबा मिळवत त्यांच्या संपर्कातील काही व्हीआयपी व्यक्तींना पैशांची तातडीची गरज असल्याचे मेसेज पाठवण्यात आले. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठी आर्थिक फसवणूक टळली.

A.R. Rahman : शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ए. आर. रहमान अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी आश्विनी भिडे यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तुमच्या नावाने कुरिअर पार्सल आले असून ते डिलिव्हर करण्यासाठी संपर्क करत असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. भिडे यांनी आपण कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आरोपीने डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलवर एक विशिष्ट कोड डायल करण्यास सांगितले. या मेसेजमध्ये सुरुवातीला 21*, त्यानंतर १० अंकी मोबाईल क्रमांक आणि शेवटी # असा कोड होता. भिडे यांनी हा कोड डायल केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग सुविधा नकळत सक्रिय झाली. परिणामी त्यांच्या नंबरवर येणारे फोन थेट आरोपीच्या मोबाईलवर वळवले जाऊ लागले.

व्हॉईस कॉलच्या माध्यमातून व्हॉट्सॲप हॅक

कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यानंतर सायबर गुन्हेगाराने आपल्या मोबाईलमध्ये आश्विनी भिडे यांच्या नंबरवर व्हॉट्सॲप सुरू करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सॲपकडून पडताळणीसाठी एसएमएसऐवजी व्हॉईस कॉलचा पर्याय निवडण्यात आला. भिडे यांच्या नंबरवर येणारा सुरक्षा कोड आधीच फॉरवर्ड होत असल्याने तो कॉल थेट आरोपीपर्यंत पोहोचला. त्यातून मिळालेल्या कोडच्या आधारे आरोपीने त्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट ताब्यात घेतले. अकाऊंटचा ताबा मिळाल्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपच्या प्रोफाइलवर आश्विनी भिडे यांचा फोटो लावला. त्यानंतर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना पैशांची गरज असल्याचे सांगत मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.दरम्यान, आपल्या व्हॉट्सॲप अकाऊंटचा गैरवापर होत असल्याचे भिडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग बंद केले आणि त्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट पुन्हा सुरक्षित केले.

झारखंड-बिहार सीमेवरून सायबर रॅकेट?

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, अशाच प्रकारच्या कॉल फॉरवर्डिंग पद्धतीचा वापर करणारे सायबर रॅकेट झारखंड आणि बिहारच्या सीमेवरील भागातून कार्यरत असल्याचा संशय आहे. याच पद्धतीने यापूर्वी शिवसेना नेत्या शाइना एन.सी., खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते संबित पात्रा आणि अभिनेत्री वनिता खरात यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हॉट्सॲप अकाऊंटला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांचा नागरिकांना इशारा

अनोळखी व्यक्तीने सांगितल्यामुळे मोबाईलवर 21* किंवा * ने सुरू होणारे कोणतेही संशयास्पद कोड डायल करू नका, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. अशा कोडमुळे फोनवरील कॉल फॉरवर्ड होऊ शकतात. त्याचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार बँकिंग सेवा, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात.

follow us