पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, पाच जणांना अटक

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, पाच जणांना अटक

पुणे : शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहेत. नुकतेच मार्केट यार्ड परिसरात एकाने सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता त्यानंतर खडकी परिसरातून देखील अशीच बातमी समोर येत आहे.

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली आहे. त्यामुळे पुण्यात आता पोलिसांचा धाक खरंच उरलाय का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास साउंडवर मोठ्या आवाजात गाणी लावून काही तरुण नृत्य करत होते. कोणती गाणी वाजवायची, या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना हटकवले असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी पाच जणांना खडकी पोलिसांनी अटक केली.

सुमित सुभाष मिश्रा (वय २०), रसल एल्वीस जॉर्ज (वय २७), ऋषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय २३), सिद्धार्थ महादेव लोहान (वय २४, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास साउंडवर मोठ्या आवाजात गाणी लावून आरोपी नाचत होते. कोणती गाणी वाजवायची, या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता.

साउंडचा आवाज ऐकून गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, सहकारी पोलीस कर्मचारी जाधव तेथे गेले. त्यांनी साउंड बंद करा, असे सांगून कारवाई करण्यास सुरुवात केली.

तेव्हा आरोपींनी अरेरावी सुरू केली. आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलीस आम्हाला काही करू शकणार नाही, असे सांगून त्या मदमस्त आरोपींनी उपनिरीक्षक बेंदगुडे आणि जाधव यांना धक्काबुक्की केली.

पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबु्क्की केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पुढील तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube