मुंबईत लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून खून; पसार आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात

मुंबईतल्या लोकलमध्ये एका प्रवाशाची क्षुल्लक कारणांवरुन चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे.

News Photo   2026 06 24T165526.078

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून (Mumbai) प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीसा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  रोशन सुवर्णा असं या आरोपीचं नाव असून त्याला कुर्ल्यावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या आरोपीने मयंक लोहार या 22 वर्षीय तरुणाची भोकसून हत्या केली होती. या प्रकरणात आता आरोपीची चौकशी करण्यात येणार असून या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास केला जाणार आहे.

मुंबईतल्या लोकलमध्ये एका प्रवाशाची क्षुल्लक कारणांवरुन चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी 11 वाजता जोगेश्वरी ते मालाड स्टेशनदरम्यान पावसाचं पाणी आत येत असल्यानं लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका टोकाला गेला की आरोपी रोशन सुवर्णा याने 22 वर्षीय मयंक लोहार या प्रवाशाची हत्या केली. मयंक हा विरारचा राहणारा आहे. लोकल ट्रेनमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने त्याच्या बॅगमधून एक मोठा चाकू काढला आणि त्याने मयंकच्या कंबरेत आणि छातीत अनेक वार केले.  हत्या करूनही आरोपी निवांतपणे चालत जात असल्याचं सीसीटीव्हीमधून दिसत आहे.

लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल

आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी सात तुकड्या रवाना केल्या होत्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. मयांक लोहारच्या छातीत आणि कंबरेत अनेक वेळा चाकूचे वार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत मयंक लोहार याने फायनान्स मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतलं होतं. गेल्या 9 महिन्यांपासून तो चाकाला येथील वेस्ट साइड येथे नोकरीस होता.

यासाठी दररोज तो विरार ते अंधेरी असा प्रवास करायचा. लोहार कुटुंबीय मूळचे नेपाळचे असले तरी ही मुंबईतील त्यांची सहावी पिढी असल्याची माहिती आहे. लोहार कुटुंबीय सुरवातीला अंधेरीत वास्तव्य होते, मात्र त्यांचं घर पुनर्विकासासाठी गेल्याने गेली पाच वर्षांपासून विरार पूर्वेकडील भोईर पाडा येथे वास्तव्यास आहे. मृत मयांकला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. मयंकच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

follow us