मोठी बातमी : मिलिंद देवरांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’ : भारत न्याय यात्रेदिवशीच शिलेदाराचा गांधींना धक्का
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेसच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’दिवशीच देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आज किंवा उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना (UBT) गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
“आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे” असे ट्विट करत ‘एक्स’ वरुन त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. (Senior Congress leader Milind Deora left the party)
Today marks the conclusion of a significant chapter in my political journey. I have tendered my resignation from the primary membership of @INCIndia, ending my family’s 55-year relationship with the party.
I am grateful to all leaders, colleagues & karyakartas for their…
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) January 14, 2024
स्थानिक राजकारणातून सोडला काँग्रेस पक्ष :
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता मिलिंद देवरा यांचाही नंबर लागला आहे. मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. मात्र त्यांचा 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी एक लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा अरविंद सावंत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवाय शिवसेनेतील फुटीनंतर सावंत एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा काँग्रेसला सोडण्याची शक्यता नाही.
यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत जाण्याचे जवळपास निश्चित केल्याचे समजते. येत्या एक दिवसांत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. गतवेळी शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा मिळावी आपल्यालाच मिळावी असा शिंदेंचा दावा आहे. शिवाय गिरगाव, शिवडी, परळ, लालबाग, वरळी, काळचौकी या भागात मराठी मतांचीही ताकद आहे. यासोबतच शिवसेनेलाही दिल्लीच्या वर्तुळात एक तगडा चेहरा मिळू शकतो. देवरा यांच्या पक्षप्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात आहे.