“दिल्लीतून एकनाथ शिंदेंचे फोन टॅप, त्यांच्याच आमदाराची माहिती”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
Sanjay Raut News : आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे (Eknath Shinde) सध्या फारसे संबंध नाहीत. शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे असे त्यांच्या आमदारनेच सांगितले असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे बहुमत असूनही राज्य सरकार अस्थिर आहे. आपल्याला अपमानित केल्याच्या दुःखातून शिंदे बाहेर पडायला तयार नाहीत. मागच्या अडीच वर्षांच्या काळातही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे तोंडे दोन दिशांना होती असा दावा संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या त्यांच्या सदरात केला आहे.
महापालिका निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊत म्हणाले, स्बळाचा नारा फक्त मुंबईपुरता..
यामध्ये संजय राऊत यांनी आणखीही काही खळबळजनक दावे केले आहेत. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री यांच्यात सध्या फारसे संबंध नाहीत. याची प्रचिती देणारे प्रसंग रोजच घडत आहेत. त्यामुळे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात नियमित जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर करून कहरच केला. यानंतर शिंदेंच्या लोकांनी दंड थोपटले. नाईक जर असे काही करणार असतील तर मग आम्ही सुद्धा गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात जनता दरबार भरवू.
राज्याचे सरकार किती बेचव आणि अळणी आहे व आपापसातील मारामाऱ्यांमुळे प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत याची फिकीर कुणालाच नाही, अशी टीका खासदार सजंय राऊत यांनी केली आहे.
शिंदे गटाचे त्यातल्या त्यात एक बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी तर आणखी पुढची माहिती देऊन गोधळात भर टाकली. शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचाही शिंदेंना संशय आहे. ही माहिती त्यांच्याच आमदाराने मला विमानात दिली असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रवी राणांची जेपी नड्डांच्या जागी नेमणूक झालीये का?, संजय राऊतांचा खोचक टोला