शेतकऱ्यांसाठी मविआ आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी…
मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) आवाज उठवणार असे काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. यानंतर आज सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
मद्य धोरणप्रकरणी केसीआरची मुलगी कविता अडचणीत; ईडीकडून चौकशी होणार
गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज असं हवामान विभागाने वर्तवला होता.
राज्याचा अर्थसंकल्प उद्या (दि.9) सादर केला जाणार आहे. आज राज्याचं आर्थिक धोरण सभागृहात मांडलं जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करतात का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.