Uddhav Thackeray : निवडणूक आयोगात आमची बाजू मजबूत, शिंदे गटाकडून दिशाभूल
मुंबई : जनतेच्या मनात कारण नसताना संभ्रम निर्माण केला आहे. शिवसेनेचं काय होणार? चिन्हाचे काय होणार? पण केंद्रीय निवडणूक आयोगात आमचा दावा मजबूत आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde) दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) सुरु असलेल्या सुनावणीबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
निवडणूक आयोगाने आम्हाला जे काही करायला सांगितले ते आम्ही सर्व केले आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथ पत्र दिली आहेत. सदस्य संख्या दाखवायचे सांगितले होते ते दाखवले आहे, त्यामुळे निवडणूक आयोगात आमचा दावा मजबूत असल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, पुढच्या गटाकडून दावा करण्यात आला की तुम्ही हे सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींवर ठरवा. पण असं नाही होत. निवडणूक आयोगाला असा निर्णय घ्यायचा असता किंवा त्यांना एकतर्फी निर्णय जरी द्यायचा असता तरी त्यांनी दोन-तीन महिन्यापूर्वीच निर्णय देऊ शकले असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व खटाटोप आम्ही केल्या आहेत. कोठेही आम्ही प्रोफेशनल एजन्सी लावून शपथ पत्र केले नाहीत. मधल्या काळात आमच्या शपथ पत्रांवर आक्षेप घेतला. तो का घेतला गेला? जर ते तुम्हाला मानायची नव्हती तर आक्षेप का घेतला गेला? आमचे पारडे भारी आहे हे कळल्यावर त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.