वाढवण बंदराविरोधात आंदोलन चिघळलं; समुद्रात उतरून ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
Vadhavan Port Protest : वाढवण बंदराच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याच्या हालचाली होताच स्थानिकांचा संताप उफाळला आहे.
Vadhavan Port Protest : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित (Vadhavan) वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील आंदोलनाने सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी तीव्र स्वरूप धारण केलं. बंदराच्या कामासाठी पुन्हा दगड वाहून आणणारे डंपर दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं. बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिक मच्छीमारांनी सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत प्रकल्पाचं काम तातडीने थांबवण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे वरोर आणि वाढवण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या पुढाकाराने वरोर येथे वाढवण बंदरविरोधात सर्वपक्षीय जनआक्रोश सभा झाली होती. या सभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बंदर प्रकल्प रद्द होईपर्यंत विरोध कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला होता. तसेच दगड वाहतुकीसाठी एकही डंपर चालू देणार नसल्याचा इशाराही आमदार निकोले यांनी दिला होता. सभेनंतर प्रकल्पाशी संबंधित काम आणि दगड वाहतूक थांबल्याचा दावा आंदोलकांनी केला होता.
‘मतं वाचवा नव्हे, घुसखोरांना वाचवण्याची रॅली होती’; अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
मात्र, सभेला दोन दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा दगड वाहून आणणारे डंपर परिसरात दाखल झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. पोलिस बंदोबस्तात डंपर आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनात स्थानिक मच्छीमारांसह महिला आणि इतर नागरिकही सहभागी झाल्याचं वृत्त आहे. प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी, स्थानिकांचा रोजगार आणि पर्यावरणावर परिणाम होईल, अशी भीती आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंदोलनाची माहिती परिसरातील गावांमध्ये पसरल्यानंतर वरोर आणि वाढवण येथे नागरिक एकत्र येत असल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस प्रशासनाला जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याची मागणीही होत आहे. वाढवण बंदराला पालघरमधील स्थानिकांचा विरोध असल्याचा दावा करत हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी पुन्हा एकदा केली आहे.