दि. बा. पाटील कोण ? नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देण्याची मागणी का? जाणून घ्या सविस्तर…

राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Navi Mumbai Airport Name

Navi Mumbai Airport Name : राज्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलं राजकीय आणि सामाजिक घमासान अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने विमानतळाला दिवंगत लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप अधिकृत घोषणा बाकी असली तरी, या निर्णयामुळे राज्यातील भूमिपुत्रांमध्ये आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवी मुंबई प्रकल्पाचा लढवय्या चेहरा

दि. बा. पाटील (Who IS D B Patil) हे रायगड जिल्ह्यातील जासई गावचे सुपुत्र. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देत त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष, (Navi Mumbai Airport) चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून त्यांनी जनतेचं प्रतिनिधित्व (Bhumi Putra Leader) केलं. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा चपराक दिली होती.

नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढा

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहर उभारणीच्या काळात हजारो शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. त्या वेळी दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी निर्भीडपणे आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि त्यांच्या हक्कांसाठी अनेकदा मोठी आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. त्यामुळेच त्यांना “भूमिपुत्रांचा तारणहार” म्हणून ओळख मिळाली.

आगरी-कोळी समाजाचे प्रेरणास्थान

आगरी, कोळी आणि शेतकरी समाजातील लोकांसाठी दिबां म्हणजे श्रद्धास्थान. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने लढा दिला. ‘आगरी दर्पण’ या मासिकाद्वारे त्यांनी फुले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वामुळे आगरी समाजात शिक्षण, संघटन आणि सामाजिक जागृतीचा नवा अध्याय सुरू झाला.

राजकारण आणि समाजकार्याचा संगम

राजकीय जीवनाच्या अखेरीस त्यांनी 1999 साली शिवसेनेत प्रवेश केला. सक्रिय राजकारणातून त्यांनी मागे घेतलं असलं, तरी सामाजिक क्षेत्रात ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही रायगड आणि नवी मुंबई परिसरात दिसून येतो.

भूमिपुत्रांच्या मागणीला यश

विमानतळाचं नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावावर करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोमाने होत होती. स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि विविध संघटनांनी आंदोलन छेडलं होतं. सरकारकडून आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातमीने प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साह आहे.

प्रतीकात्मक सन्मान

दि. बा. पाटील यांच्या कार्याने नवी मुंबई आणि रायगडचा चेहरा बदलला. त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि नव्या पिढीला आत्मविश्वास. त्यामुळे विमानतळाला त्यांचं नाव देणं म्हणजे केवळ नामकरण नव्हे, तर भूमिपुत्रांच्या संघर्षाला दिलेलं एक ऐतिहासिक अभिवादन ठरणार आहे.

follow us