Pune corporation : पुण्यात भाजपच्या वाटेवर असलेला काँग्रेसचा ‘तो’ माजी नगरसेवक कोण?; चर्चांना उधाण

  • Written By: Published:
Pune corporation : पुण्यात भाजपच्या वाटेवर असलेला काँग्रेसचा ‘तो’ माजी नगरसेवक कोण?; चर्चांना उधाण

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला अर्ज न दाखल करता आपल्या मुलाचा म्हणजेच सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसचे पंचायत झाली. दरम्यान, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला. हा वाद सुरू असतानाच पुण्यातूनही काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचा एक ज्येष्ठ माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी या नगरसेवकाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील सहकारनगर परिसरात आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले असता त्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर या नगरसेवकाच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळू शकतो आणि काँग्रेसला मोठा झटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

हा नगरसेवक काँग्रेसचा ज्येष्ठ नगरसेवक असून सुमारे ते चार टर्म पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या नगरसेवकाचा पुण्यातील राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असेल, असेही बोलले जात आहे.

याआधी या नगरसेवकाने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही पक्षप्रवेशाबाबत भेट घेतली होती. मात्र, चंद्रकांतदादांनी त्यावेळी स्थानिक आमदारांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता गेल्या आठवड्यात या नगरसेवकांनी थेट फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र अनेकांकडून राजकीय तर्क लढवले जात आहेत.

संबंधित नगरसेवक हा भाजपमध्ये प्रवेश करून स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. त्यामुळे हा नगरसेवक नेमका कोण?, असा प्रश्न पुण्यातील काँग्रेससह भाजप आणि अन्य पक्षातील नेते मंडळींना पडला आहे.

दरम्यान, एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, दिवसेंदिवस काँग्रेसचा हा गड ढसाळताना दिसत असून भाजप दिवसेंदिवस आपली ताकद वाढवत आहे. भाजप या नगरसेवकाला पक्ष प्रवेश देईल का? असे तर्क अनेकांकडून लढवले जात आहेत. मात्र, एकंदरीत भाजपचे राज्यातील राजकारण पाहता अन्य पक्षातील नेते मंडळींना पक्षप्रवेश देणं काही अवघड काम नाही. आता प्रश्न असा आहे की, या नगरसेवकाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश दिला जाईल की त्या आधीच? मात्र, यावरून पुणे शहरातील राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube